Wednesday, October 24, 2012

ऋजुता दिवेकर: एक ऊर्जा



ऋजुता दिवेकर 
फिटनेस आणि आहार वर्तुळातील प्रथितयश व्यक्तिमत्त्व.. भारतातील आघाडीची  आहारतज्ञ शिवाय DON'T LOSE YOUR MIND LOSE YOUR WEIGHT आणि  WOMEN AND WEIGHT LOSS TAMASHA या दोन सर्वाधिक वाचक लाभलेल्या पुस्तकांची लेखिका!आहार नियमन आणि पोषणशास्त्र या विषयातील  किचकट संज्ञा अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगण्याची हातोटी,आणि या विषयातील त्याचं सखोल ज्ञान त्यांची पुस्तक वाचताना अधोरेखित होत. 'इट लोकल थिंक ग्लोबल' हा त्यांच्या पुस्तकातील संदेश बराच सांगून जाणारा आहे.
 याच विषयाची विद्यार्थिनी म्हणून मला त्यांच्याकडून शिकण्याची संधी मिळावी असा विचार करत असतानाच २० ऑक्टोबर २०१२ रोजी त्यांच्या 'pay as you like a day' या उपक्रमा अंतर्गत मला हि संधी मिळाली.
हा उपक्रम सेवादायी संस्थेसाठी केला जात होता हे या उपक्रमाचे विशेष!(तुम्ही स्वखुशीने देऊ केलेली रक्कम सेवादायी संस्थेला देण्यात येणार होती).शिवाय हा उपक्रम नेटक्या पद्धतीने राबविण्यात आला.
 समाजात  आहारविषयक सजग आणि डोळस जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने त्यांचे हे पाऊल नक्कीच स्तुत्य म्हणावे लागेल.
त्यांच्या आहारविषयक मतांची यानिमित्ताने प्रत्यक्ष ओळख झाली. त्यांच्या कार्यालयात दुपारी ३ वाजता माझी appointment होती आणि मी पावणे तीन च्या सुमारास त्यांच्या कार्यालयात पोहोचले.
माझ्याआधीचे consultation सुरु असल्यामुळे मी थांबले होते. 
त्यादरम्यान एका वयस्क बाईंशी माझी स्मितहास्याने ओळख झाली. त्यांनी माझ्याकडे पाहून मला विचारलं;
बाई : आप?
मी: मै ऋजुता मैम के सेशन के लिए आई हू|
बाई: अच्छा,लेकिन आप तो काफी दुबले हो;आप को क्या जरूरत है वजन घटाने की ?..
मी: (आहार तज्ञ म्हणजे वजन घटविणे हा समज किती दृढ आहे) मुझे फिटनेस बढ़ाना है..
बाई: हाँ लेकिन यह बहोत  expensive है .. मैंने बहोत  साडी  dietician देखी है,डाइट फॉलो किया है..इनकी भी बुक पढ़ी है..जैसे लिखा है ; वैसेही फॉलो कर रही हूँ...मुझे  अभी पूछना है ..यह  है  क्या? कैसे  करना  है ..लेकिन इसका फीज बहोत है..
मी: लेकिन aunty वोह इतनी परफेक्ट  गाइड करती है ...और यह तो चैरिटी के लिए सेशन है...
बाई: हाँ फिर भी..
मी: और अभी जो बुक्स available है  वोह  इतने  technicle भाषामे लिखी हुई है..रुजुता के बुक्स ऐसे नहीं है ...इतनी आसान भाषा में डाइट की  परिभाषा बहोत कम  बुक्स में है ..
बाई: मैंने दोनों बुक्स पढ़े है..आसान भाषा है यह बात तो सही है..फिर भी..
मी: आप गुजराथी हो?( मराठमोळ मन सॉरी :)
बाई:(बाईंनी सहमतीदर्शक मान डोलावली) और आप?
मी: महाराष्ट्रीयन!
बाई: आप क्या करते हो?
मी: मै nutrition स्टूडेंट हूँ
बाई: अच्छा..

आमच संभाषण सुरु असतानाच आम्हाला आत बोलावण्यात आलं..३ वाजले होते.. ऑफिसमध्ये प्रसन्न आणि शांत वातावरण होत. प्रवेश केल्या केल्या हातात सूप घेऊन उभी असणाऱ्या स्त्रीची मूर्ती होती..आणि विशेष म्हणजे सुपात तांदूळ होते..:) 'डाएट'बद्दलचा तुमचा पहिला धडा..तांदूळ/भात खाणे वर्ज्य नाही!! 
मराठीत एक उक्ती आहे;'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले!'ऋजुता दिवेकर यांच्या बाबतीत हे तंतोतंत लागू पडते.
इतक्यात आतील खोलीतून ऋजुता बाहेर आल्या आणि त्यांनी स्मितहास्याने स्वागत केल..जितक्या सहजतेने त्यांच्या पुस्तकात आहार नियमनाबद्दल  लिहिलंय तितक्याच सहजतेने त्यांची टीम तुमच्याशी संवाद साधायला सुरुवात करते. आहारातील छोट्या छोट्या गोष्टी,खाण्याचे नियम समजावत असतानाच 'योग्य वेळी योग्य तेच योग्य प्रमाणात खाण' याच महत्त्व पटत जात. आहारतज्ञ समोर बसली आहे म्हणून दुजाभाव नाही किंवा हे काहीतरी मोठ्ठ आहे याचा लवलेश नाही. ऋजुताची आहारतज्ञ सौम्या संयमाने माझ बोलण ऐकत होती आणि आहाराबद्दलच्या माझ्या प्रश्नांना उत्तरदेखील देत होती.मला आहारशास्त्रातील काही नियम नव्याने कळले होते. बरोबर ४५ मिनिटांनी माझ सेशन पूर्ण झालं.

नंतर पुन्हा एकदा गुजराथी बाईंची आणि माझी भेट झाली. त्यांचा चेहरा उत्साहाने फुलला होता.
"कैसा था सेशन?" मी विचारलं. हाताने खुणावत १८० अंशात हसत त्यांनी उत्तर दिल "एकदम बेष्ट!" यातच ऋजुता आणि त्यांची टीम जिंकते अस मला वाटून गेलं.त्याचं शिक्षण तुम्हाला नवी ऊर्जा देऊन जात.

माझी मैत्रीण मी ऋजुता दिवेकर यांच्या सेशन साठी जाणार आहे हे ऐकून मला म्हणाली होती,"स्वतः आहार तज्ञ असताना काय गरज आहे जायची?" माझ उत्तर होत," शिकायला मिळत ग" त्यावर तीच उत्तर होत,"अस सगळ खाऊन काही होत नसतं; गिमिक आहे;का वेळ वाया घालवतेस उगाच! फसवणूक तुझी आणि त्यांचीपण[कारण मी आहारतज्ञ!] "(जर हे ती वाचत असेल तर मला आवर्जून सांगायचं, सगळ व्यवस्थित खाल्लं तर बरंच काही होऊ शकेल यावरचा माझा विश्वास द्विगुणीत झालाय आता)

ऋजुता दिवेकरांच्या आहार नियमन आणि फिटनेस  याबाबतच्या चतु:सूत्री अंमलात आणून (मस्त खा)स्वस्थ राहा! गुजराथी आजींच्या भाषेत सांगायचं झाल तर"एकदम बेष्ट!"


ता.क.: ऋजुता दिवेकर यांच्या पुस्तकात मसाला चहा चा उल्लेख अनेकदा केला गेलाय. मी "हा वेगळा चहा आहे का?" अशी विचारणा करता मला खरंच तो चहा दिला गेला. 
पारंपरिक पद्धतीने बनवलेला उत्तम चहा मी चाखलाय! :)


Wednesday, August 1, 2012

ज्याचा त्याचा पाऊस -२


१३.
पाऊस म्हटलं कि मला आठवत आम्ही सगळी भावंड लहानपणी एकत्र येऊन वाड्यामागच्या तळ्यावर जायचो घरातील कागद घेऊन.. होड्या बनवायचो.. आणि मस्त खेळायचो पावसात...
एकदा तर दादांची (आमच्या आजोबांची) छत्री घेऊन तीत पाणी भरून होड्या गोल गोल फिरवत बसलो होतो  काय ओरडा खाल्लाय..अर्थात आऊ साहेबांचा! आणि गम्मत म्हणजे दुसऱ्या दिवशी दादा स्वतःच आले आणि आम्हाला त्यांची छत्री देऊन म्हणाल," भरपूर धमाल करा पठ्ठ्यानो.. हेच दिवस उलट्या छत्रीत पाऊस साठवायचे...कित्ती खूष झाले होते मी आता मोठ झाल्यावर दादाचं बोलण उमगतंय मला...तेच दिवस उलट्या छत्रीत पाऊस साठवायचे..

१४.
अलीकडे फक्त गाडीतून पाऊस भेटतो तितकाच..बरेच दिवसात मनसोक्त भिजलो नाहीये पावसात..आयुष्य काय सिनेमातल्यासारख असतं होय? त्या जब वी मेट मध्ये शाहीद आणि करीना काय सुंदर नाचतात ग पावसात? मी गाडी थांबली कि त्या पावसात त्या दोघांना पाहतो आणि गाडीतून बाहेर पडून त्यांच्यासोबत नाचत राहतो...बराच वेळ....पाऊस..असा अलिप्त आणि पांढरपेशा झालाय आताशा..माझ्यासाठी 

१५.
बारिश आयी तो मालक बहोत डाटता है| "रास्ता ख़राब हो तो कैसेभी करके बनाओ बनाओ" कहता रहता है.. "रात दिन मर मर के काम शुरू करो और ऐसे करो की फिर से रास्ता बनाना पड़े अगली बारिश में| बहोत बार दिल किया इसका असली चेहरा दुनिया के सामने लाऊ..बतादू सबको माल में बहोत गफला करता है..और बारिश को गलद ठहराता है.. मै तो बारिश का दीवाना हूँ और ये उसीको गलाद कहता है...बदमाश.. लेकिन मै तो ज्यादा पढ़ा लिखा हूँ नहीं|
लेकिन एक बात अच्छी है बारिश दूध का दूध और पानी का पानी कर देती है !

१६.
पाऊस म्हणजे..अस कस सांगणार..पाऊस म्हणजे ओह्ह नो..हा बघ पाऊस असा कोसळायला हवा पाऊस..पाऊस आहाहाहा याला म्हणतात पाऊस... मी बघतच राहिले..
अलीकडे मी नुसत पाऊस म्हटलं तरी पाऊस पडतो..अगं खरच ( असं लूक देऊ नको..) मलाच आश्चर्य वाटायला लागलंय! त्याला कळलं असाव बहुधा.. आपल अस बरसन कोणालातरी इतक सुखावून जात.. वेडा पाऊस!

१७.
पाऊस म्हटलं कि मला आठवतो श्रावण गं! आम्ही सगळ्याजणी मिळवून इतके खेळ खेळायचो..सोबत पाऊस असेच. खास कोणाचं तरी घरच बुक करून टाकायचो... आताच्या नव्या मुलीपण हौशी आहेत गं...कालच कमल मला म्हणाली सुनेची मंगळागौर आहे म्हणून...सगळ पुन्हा आठवलं काय दिवस होते मी तर इतक्या हिरीरीने गाणी म्हणायचे,आणि खेळायचे...(इथे आजीच खट्याळ हसण)
मला आठवत एकदा अश्याच फुगड्या रंगल्या होतं आणि तुझे मामा आजोबा त्यांनी कुठूनसा प्लास्टिकचा साप सोडला आमच्यात... रेखाची..तुझी मावशीआज्जी गं.. अशी बोबडी वळली की विचारू नको...बर बाहेर तर पाऊस..जाणार कुठे वेडी? सगळ्यांची हसून हसून पुरेवाट..झाली होती..त्याला नेहमीच खोड होती अस काहीतरी करत रहायची आणि रेखा नवी त्यावर्षी (आज्जी अशीच काय काय सांगत राहिली आणि मी बाहेरचा झिम्माड पाऊस पाहण्यात तिच्या आठवणीत बुडून गेले)

१७.
मला पाऊस म्हटलं कि अभिराजने तयार केलेली होडी आठवते.एकदा मस्त रात्रभर पाऊस कोसळला होतं आणि हा पठ्ठ्या मला जोर जोरात हाक मारत होता ताई तायडे ताई,लौक्कर बाहेर ये!
हा बघ पाऊस.. आणि हे बघ मी काय बनवलाय...मी जाऊन पाहिलं तर हे महाशय मस्त साचलेल्या पाण्यात होडी सोडत टाळ्या वाजवत होते..मला गम्मतच वाटली त्याची! आणि थोड्या वेळाने लक्षात आलं या माणसाने माझीच कोरी वही वापरली होती होडीसाठी!! मग सगळा गोंधळ आणि भांडण..रडारड. सगळ साग्रसंगीत साजर झालं. अभिला कळेच ना त्याच काय चुकलंय.. मग आऊसाहेबांनी समजूत काढली. आणि माझा छोटा भावडा बिचारा..एवढास तोंड झालं त्याचं! मी रडून धुमाकूळ घातला होता. मी आधी घुश्श्यातच होते.एकटीच बसले होते;त्याच्याशी काहीच न बोलता! तर मला म्हणतो,"तायडे, ही घे तुजी वही! मला नको ती.. पुन्हा होडी करणार नाही. सॉरी मी डोळ्याच्या कोपऱ्यातूनच  पाहिलं.. तर त्याने सगळ्या होड्या सोडवून कागद पुन्हा सरळ केलेले मला इतकं हसू आलं त्याचा वेडेपणा पाहून! त्याला तसाच घेऊन मी बाहेर गेले..मस्त पाऊस पडत होता..म्हटलं "चल, होड्या बनवूया!".दोघांची दोन मिनिटात बट्टी झाली. असा वेडा पाऊस आणि माझा वेडा भावडा आणि मी!

१८.
माझा पाऊस म्हणजे कर्नाळ्यापर्यंतचा रम्य प्रवास! बस मध्ये मस्त गाण्यांच्या भेंड्या सुरु होत्या. आणि मी बाहेर कोसळणाऱ्या पावसात गुंतून राहिले होते.. धुवांधार पावसात रमण म्हणजे काय ते अनुभवत होते. रस्त्यावर दाटलेलं धुकं तेही पावसात! आणि हाय :) ते इंद्रधनुष्य! मी माझी नव्हतेच जणू.. त्या पावसाचीच होऊन गेले होते. तेव्हापासून मला पाऊस जास्तच आवडतो. रम्य पाऊस! 

१९.
पाऊस म्हटलं की मला आठवत माझ गाव! गावच्या घरामागची संथ वाहणारी नदी आणि त्या नदीकिनारी बहरलेलं माझ बालपण! पावसात नदी नेहमीच वेगळी दिसत असे. मला वाटायचं पाऊस या नदीपासून सुरु होतो आणि हिच्यावरच संपतो...नंतर विज्ञान शिकताना समजलं समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन नंतर पाऊस पडतो...तेव्हा वाटल आपली नदी सुद्धा साद देत असेलच आभाळाला! उगीच नाही आपल्याला भावत नदीकाठचा पाऊस! असं वाटत या नदीमध्ये आपणही विलीन होऊन जावं. मुंबईत सगळे एकतर मरीनलाईन्स च्या किनाऱ्यावर पाऊस एन्जॉय करतात किंवा घरात बसून खिडकीतून पाऊस अनुभवतात. पण ते निसर्गाशी एकरूप होण मी,माझा पाऊस आणि माझी नदीच जाणो!

२०.
ओह माय गॉंड पाऊस. तुला माहितेय मी बॉय'ज हॉस्टेल मध्ये राहायचो तेव्हा माझा एक मित्र होता वेदांत..इतकी छान गिटार वाजवायचा तो! कॉलेजचा रॉकस्टार होता तो...पाऊस असला कि तो इतका तल्लीन होऊन वाजवत असे कि असं वाटायचं याच हे संगीत कधी संपूच नये. त्याच्या भोवताली सदानकदा मुलींचा गराडा असे. पण याने कधी शायनिंग मारलेली नाही. एकदम वल्ली माणूस! फक्त खोलीत आला कि मिश्कील चेहरा! आमचा रूम मते अमेय मस्त गाणी लिहायचा आणि गायचासुद्धा!
पाऊस सुरु झाला की हे दोघे सुरु!हा मस्त गिटार घेऊन बसायचा..थोड्या वेळाने अमेयची गाणी..पाऊस संपेपर्यंत तेच! अगदी रात्री २-३ वाजले! त्याची गिटारची धून, अमेयचा आवाज,गाणी  आणि तो पाऊस बास्स! 
            आता सगळे बिझी असतात.फारसं भेटणही होत नाही. कधीतरी फोन, इंटरनेट इतकंच! अमेय पुण्याला  असतो आणि वेदांत गोव्याला! पण पाऊस असला की मी फार मिस करतो त्यांना!
त्याच ड्रंग डिंग.. म्युझिकल रेन यु नो...


ता. क. पाऊस असाच भिजवत राहणार! तुम्हाला, मला नवे नवे अनुभव देत राहणार जुन्या आठवणींना स्वतःसोबत घेउन येणार ..तुमच्या पावसात मनसोक्त भिजत रहा..नव्याने (क्रमश :).





Friday, July 13, 2012

ज्याचा त्याचा पाऊस-१



१: 
पाऊस मला आवडतो;मज्जा नुसती! चपक ठपक ठपक  करत चालायचं  रस्त्याने ...पाणी उडवत; एक - दुसऱ्यावर.. रेनकोट,दप्तर असं सगळ तयार होऊन जायचं आणि खेळायचं मज्जा मज्जा! यावेळी मी आईला म्हटलं होत छत्री हवीये पण भिजते न मी आणि आजारी पडते(असं आई म्हणते) यावर्षी छत्री नाही. मी हायस्कूलमध्ये गेल्यावर छत्रीच घेणारेय..आम्ही सहाजण नं..म्हणजे मी,अदिती,रंजन,सुरभी,पंचमी,शार्दुल आम्ही नं सगळे एकदम धम्माल करतो रस्त्याने येताना! मुद्दाम भिजतो आणि खूप खूप हसतो.. एकदम मोठ्या मोठ्याने असं वर बघायचं पाऊस आ करून खायचा आणि पुन्हा हसायचं शाळेतून येताना पाऊस असला कि मज्जा मज्जा सगळी
२.
मला नं पावसात भिजायला आवडत! असं वाटत पाऊस रुजत राहावा फक्त आपल्यात संपूच नये! प्रसन्न वाटत अगदी :)
३.
पाऊस म्हणजे मातीचा सुगंध...काहीजण उगाच वास वगैरे म्हणतात बावळटासारखे. एकजात मूर्ख! गंध गं गंध!! श्वासात भरून घ्यावा इतका निर्मळ...आणि सुखद! वास म्हणे.. वेडे एकजात सगळे
४. 
उगाच नाही कवी लोक कविता वगैरे लिहित पावसावर...एकीकडे पाऊस सुरु असतो आणि एकीकडे कवींच्या कविता. पाऊस म्हणजे न देणगी आहे ग...किती बोलाव संपता संपत नाही. लहान बाळ,शाळेत जाणार मूल, तरुण,वयस्क,आजी आजोबा...सगळ्यांना आवडतो पाउस! ऋतूराज म्हटलं तर वावग ठरू नये. माझ्यापुरत सांगायचं झाल तर पाउस म्हणजे कधीही जुना न होणारा अनुभव आहे प्रत्येकासाठी...वेगळा आणि खास! शब्द अपुरे.. 
५.
पाऊस..एकदम स्पेशल ऋतू माझा.. तुला माहितेय,माझी आणि अनिशची भेट पावसातच झाली होती मस्त कुंद वगैरे म्हणतात न तसं वातावरण होतं ...आणि मी एकटीच चालले होते...वाटेत याने लिफ्ट देऊ केली होती...जेव्हा याच्यासोबत बसले तेव्हाच क्लिक झाला ग अनिश! त्यालाही तेव्हाच जाणवलं असाव कदाचित...पावसाने मला माझं बेस्ट माणूस दिलंय..तुलाही भेटेल बघ असाच कोणीतरी..
६. 
मला काही पावसाळा इतका आवडत नाही....चिखल सगळा...कित्ती ते पाणी...मस्त कोरड्या रस्त्यावर चालावं तर मध्येच हा येणार...मग छत्री उघडा आधी शोधा...असेल तर ठीक नाहीतर बोंबला..हे भिजत यायचं...थोडफार भिजलं ठीक आहे पण ऑफिसला जाताना आला  कि राग येतो ग खूप...दुष्टच वाटतो...घरी असले तर  पडावं नं पण नाही...असं कध्धीच होणार नाही...काही लोकांना पावसाळ्याच जरा जास्तच कौतुक असतं.म्हणजे असावं पण मला काही स्पेशल वगैरे वाटत नाही. हं मुंबईत पाणी टंचाई होऊ नये इतका पड आणि जा बाबा; धांदल उडवून फसवत जाऊ नको..
७.
पाऊस म्हणजे वाफाळता चहाचा कप आणि सोबत गाणी....अहाहा काय सांगू!! पाऊस म्हटलं कि जे फिलिंग येत न ते मुसळधार पावसात गरम चहाचा कप हाती ठेवून,मस्त खिडकीत बसून पाऊस नजरेत साठवून घेणाऱ्यालाच  ठाऊक! असं सांगून नाही कळायचं...
८.
पाऊस म्हटलं कि मला आपल कॉलेज आठवत गं...एकतर मस्त दाट हिरवळ असते सगळीकडे आणि आपला दंगा...चप्पल हातात घेऊन त्या वाहणाऱ्या पाण्यात चालायचं धमाल....नुसती... तुला माहितेय..ती कविता... सफेद घोड्यावर होऊन स्वार येईल कुठूनसा राजकुमार....पाऊस आपला राजकुमार म्हणजे माझा आणि तुझा...आभाळ बाबाला झाकोळून काळ्या-पांढऱ्या ढगांवर स्वार होत होत पाऊस बरसतो...आणि आणि कसं स्वच्छ  बरसण.. इथे कमी.. तिथे जास्त असं काही नाही पावसाच! असं कितीवेळा अनुभवलंय..हे घरात बसून पावसाचा आनंद लुटण वगैरे झूठ आहे ग सगळ...त्याच स्वागत करायचं नव्याने कारण दर वेळी तो नवीन असतो..मी तर मस्त घराबाहेर पडते...आता आईला पण सवय झालीये आता तिला माहितेय मी काही पावसात घरी थांबणार नाहीये ..मस्त मुक्त भटकायचं पावसात! प्रत्येक वेळी नव्याने भेटतो बघ पाऊस
९. 
पाऊस? किती बोलू आणि किती नको... तुला कल्पना नाहीये गेल्या वर्षी वर्षासहलीला गेलो होतो आम्ही धमाल..धमाल म्हणजे काय ते कळलं मला..अगं म्हणजे देणाऱ्याने देत जाव घेणाऱ्याने घेत जावे तसं मी फक्त आणि फक्त आनंद लुटत होते....त्यातून आमच्या ग्रुप मध्ये दोघे कवी होते काय सुंदर पाउस कविता ऐकवल्या त्यांनी दोन दिवस चिंब चिंब होऊन आलो आम्ही....मी शिरीषला पण सांगितलं होत बोअर होणार नाहीस आणि त्याने पण इतक एन्जोय केलाय...पाऊस!! मला तेव्हा वाटलं आपल्याकडे पाण्याचा पाऊस पडतोय ते बराच आहे ते बर्फ वगैरेचा पाऊस पडतो न त्यात असं न्हाऊन जाता येत नाही...पाऊस होऊन जातो आपण
१०.
पाऊस म्हणजे कवितांची मैफिल....म्हणजे माझी अशी कल्पना आहे कि पाऊस पडत असेल आणि जर कवीला कविता सुचत नसेल तर आयुष्य व्यर्थ ग...काहीच केल नाही असं म्हणेन मी..
पाऊस कसा का असेना रिमझिम,मुसळधार लेखणी लिहिती व्हायलाच हवी..आपण सगळे कसे कविता वाचत बसतो बर वाटत..भारलेल्या वातावरणात...पाऊस त्यात कविता....परमानंद।
११.
पावसात फूटबॉल खेळायचा तुफान,,,चिखलात! मस्त आम्ही सगळे फुल ओंन असतो खेळताना....डोक्याने टोलवायचा..आणि सुटायचं मैदानात झोकून द्यायचं सगळ्यांना शाळेचा ग्रूप आणि दुसरा एक पक्का फुटबॉलर्सचा ग्रुप आहे.अस्मानी तुफानी चा फील येतो..पाउस असेल तर.. मनसोक्त खेळायचं....पाऊस आपला पाठलाग करतो आपण त्याला निवांत त्याच काम करू द्यायचं आणि फुटबॉलवर मात्र आपलाच ताबा पाहिजे.. एकदम राजे आपण....आमच्यात गब्बू आहे न तो जाड्या गं..त्याला अस पळवतो म्हणून सांगू आम्ही.. ४ किलो वजन कमी झालंय त्याच खेळून खेळून.. गमतीचा भाग वेगळा पण खरच पावसामुळे जो उत्साह संचारतो नं तो वेगळाच असतो..फुटबॉल आणि पाऊस..हे अजब समीकरण आहे! 
१२.
पावसाबद्दल काय बोलनार ? उगा चेष्टा गरीबाची? पडला तर बरंय पण ज्येवढा मोजका तेवढा भला हो... न्हायतर समद नुस्कानच! पिक गेलं तर खायचं काय? आणि आताशा इतका नाटकी झालाय...पडतो काय गायब काय होतो....मी तर दर येळी त्या इठ्ठलाला सांगतो वारीला जसा सोबत आनतोस तसा मोजकाच पाड की; उगीच पाणी पाणी करून केलेली मेहनत पाण्यात नको जायला..पोर जातात ओ भिजायला,खेळायला मी बी जायचो लहान होतो तेव्हा...अगदी शाळेत गेलतो तेव्हापर...पार एकदम.. आता पोट तर पाह्यला पाहिजेच का नाय? जातात ते कष्ट नि रहातो तो पाऊस उनाडक्या करनारा..बाकी काय?
(क्रमश:)


ता .क .पाऊस नेहमीच नवे नवे संदर्भ घेऊन येतो. ही काही पाऊस-मनं। वेगवेगळे दृष्टीकोन...ज्याचे त्याचे... आणि 'क्रमश:' यासाठी कारण आणखी पाऊस-मनं भेटतच राहणार..

Tuesday, July 10, 2012


हवाओंसे हमने पूछा 
यह संदेस किसका है?
कम्बख्त सिर्फ बहारे बन गई
और बारिशे होने लगी
.
.
.
.
.
.हलके हलके गुफ्तगूसी!
-पल्लवी
८/७/२०१२ 

Saturday, July 7, 2012

पाऊस(त्याच्या मनातला)




त्या दूर आभाळामधुनी.. 
सांडले अनामिक मोती, 
तुझ्या पापण्यांवरची..
ती सरही नाजूक होती


लागे मज कसली आस?
या धूर्त किनाऱ्यावरती,
सुखवे स्पर्श लाटेचा..
उरली ती कोवळी रेती


मी मुक्त खयाली वेडा..
मन तुझे उमगले नाही,
आभास तुझे भवताली..
पाऊस उलगडे नाती!


मनमौजी मी अलवार
झेलतो सरी हातात..
वाटे जणू अल्लड वारा,
घुटमळतो या मेघांत.


वीज लखलखते ही न्यारी,
पडसाद अंतरी मोठे..
डोळ्यात तुझ्या तेव्हाही
हे क्षण मी वेचले होते...





 

ता.क...:फार सुंदर पाऊस पडतोय.. त्यानेच भाग पाडलंय हे लिहायला..)
५ जुलै २०१२ 

Saturday, June 30, 2012

पाऊस




पाऊस  म्हणजे जमिनीने आभाळाला दिलेला वरचा 'नी', 
पाऊस  म्हणजे...तिच्या डोळ्यात मुग्ध मी..
पाऊस म्हणजे पानासंगे गाते वेडे फुल,
पाऊस म्हणजे अनंताची अल्लड चाहूल,,
पाऊस  म्हणजे कवीच्या प्रतिभेचा अंकुर,
पाऊस  म्हणजे नव्याने गवसलेला सूर..
पाऊस  म्हणजे ढगांचे अस्तित्वामागचे  देणे,
पाऊस  म्हणजे निसर्गाचे नितांत सुंदर  लेणे..
पाऊस  म्हणजे हळुवार नात....पाउस म्हणजे सुसाट वाट..
पाऊस  म्हणजे रविराजाचे ओलावलेले प्रेमळ हात.
पाऊस  म्हणजे सर नितळ, अस्तित्वाला अर्थ फार, 
तो असतो आभाळभर; सोबत तिचा निरागस होकार... :)


Monday, June 11, 2012

पाऊस..बडबडगाणे!!



कुंद हवा दाटे आज
कानी येई अल्लड गाजI
तेच आकाश तेच ढग 
तरी वेगळे वाटे जगI

विज्ञानाचे आडाखे चुकवून
अचानक सांडे कोवळे ऊन,
ऊन-सावल्यांचा खेळ सारा 
मोसमी वारे अफलातूनI

आगमनाची सारी वर्दी
पाऊस झेलण्या आले दर्दी..
सफेद कापूस गडद रंग,
पाऊस- कौतुकात सारे दंगI
झिम्माड पाऊस ओली माती
पक्षी सारे गाणे गातीI 
ओल्या सरी हिरवे रान..
पाहून सारे हरपे भान..

निसर्ग सारा गोड निरागस
किती कौतुक गावे रे?
विरले  सारे पाश आता 
सरींच्या गावा जावे रे!
                                                                                     

Tuesday, June 5, 2012

बंद


आम्ही बंद केलाय बर का;आम्ही बंद केलाय 
आमचा आवाज आणि आमच्या संवेदनासुद्धा 
हो बंद केलाय आम्ही..
दरवाढीविरोधात जोरदार विरोध करण्यासाठी आम्ही बंद केलेत आमचेच रोजगार..
आणि मिळवून दिले आहे माजलेल्या नेत्यांना आयतेच स्वतःच्या शक्तीप्रदार्शनासाठीचे आगार!
घरी बसलोय आम्ही स्वतःचा आवाज बंद करून आणि TV मात्र मोठ्याने सुरु करून! 
पाहत होतो; कॅमेरा पहिला की गर्वाने ठरवून पोलीसगाडीत बसलेले 
आम्हीच निवडून दिलेले माजोरडे राजकारणी 
ज्यांच्या डोळ्यात होते फक्त फुशारकीचे  तर्रेबाज भाव आणि माज नेहमीसारखाच 
(याच मंत्र्याची मुलगी माझ्यासमोर सुरक्षित चारचाकीत बसून परीक्षेसाठीबरोबर अडीच वाजता कॉलेजमध्ये आली..... 
माझ्या डोक्यात वेगळीच तिडीक ...घणाचे घाव घण! घण! घण!!....
 मी आणि माझ्यासारखे बरेच मूर्ख! परीक्षेला उशीर होईल म्हणून सकाळी ८ वाजता घराबाहेर पडलेले  
सगळीकडे पायी फिरत... एक रेल्वेचा काय तो आधार फक्त 
आई बाबांचा काळजीने दाटलेला स्वर वाजणाऱ्या मोबाईलमधून)
 आणि हे काय?
व्वा!याच नेत्यांची माणस फिरताहेत बर का बाइक्सवरून..पक्षाचे झेंडे घेउन
ओरडत आहेत.. पेट्रोल दरवाढीविरोधात घोषणा देतायत.. बाईकवरून??
राग येतोय..की कीव करावी या मुर्खांची तेच समजेनास झालंय..
सगळा अस्वस्थ कारभार म्हणायचा... पैशाचा तमाशा दुसर काय?
तरी बरंय.. मी बंद केलीयेत माझी पंचेंद्रिय काही काळासाठी...
त्यांना त्रास होऊ नये या मूर्खपणाचा म्हणून..

अर्रे!! तरी पहिलाच मी एकाने समोरून बसवर मारलेला दगड आणि हसत ठोकलेली धूम??
तो काय.. कॅमेरा सुरु आहे समोर...लाइव्ह टेलिकास्ट सुरु आहे.. तरीच!
नेहमीचंच सगळ चित्र... 
हो मी बंद केलंय माझं मत त्या इलेक्ट्रिक मशीनमध्येच..
पण आता मी बंद केलाय सगळ्याचा विचार कारण
सगळ्यांना वाटत स्वतः काही न करत यांना काय टीका करायला?
पण माझा आवाजच बंद आहे सध्या
कारण मी 'बंद' केलाय माझ्या आयुष्यात; 
त्यामुळे या 'बंद'च काहीच वाटेनास झालंय 
कारण बंद केलंय हो आता विचार करणंच
अविचारी बंडाचा विचार डोकावतो अधूनमधून...
पण मी बंद केलंय माझं मत मांडण.. 
हे एवढंच अगदीच राहावलं नाही म्हणून; इतकंच! 

असो.

Saturday, May 26, 2012

मधली सुट्टी आणि धमाल!


             शाळेत असताना नेहमी तास संपल्याच्या वेळेव्यतिरिक्त खास बेल होत असे! मधल्या सुट्टीची :) 
मधली सुट्टी म्हटलं की डोळ्यासमोर येतो आईने करून दिलेला डबा आणि दोस्तमंडळींसोबत केलेली धमाल.
लहान असताना शाळेत जाण म्हणजे  गम्मत वाटायची. आपल्यासारखेच सगळे मॅड! कोणी अगदीच शांत तर कोणी उगाच खोड्या काढणार ,कोणी रडक ,कोणी मस्त गमतीदार...सगळंच नवीन...आणि कोवळही .बालवर्गात प्रवेश झाल्यानंतर शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली 'वदनी कवळ घेता....अशी साग्रसंगीत सुरुवात करून' डबे खायला सुरुवात केली होती.नंतर नंतर 'श्पेशल'  बाळांचा ग्रुप डबा खायला बसायचा..एकत्र! :) 

           कोणी काय काय खाऊ आणला आहे ते पाहिलं जायचं. नावडती भाजी-आवडती भाजी ची देवाणघेवाण व्हायची...आईने केलेला खास डबा बरेच वेळा  जास्त असायचा. सगळ्यांना वाटून खा;आई सांगायची... मी मॅड सगळ्यांना वाटून काही उरलं तरच खायचे....कारण आईने सगळ्यांना वाटून खायला सांगितलेलं आहे न...बालवर्गात मधल्या सुट्टीत खेळ पण खेळले  जायचे कधी पकडापकडी,लपाछुपी (हा सगळ्यात गमतीदार खेळ) सुरुवातीला भरपूर भूक लागल्याने कधी एकदा मधल्या सुटीचे टोल पडतील आणि डबा सगळ्यांना वाटतेय आणि खातेय  असं व्हायचं..नंतर डबा राहिला आणि कधी एकदा खेळायला मिळतंय याची वाट पाहायचो कारण खेळाच्या तासाला व्यायाम जास्त...'श्पेशल' खेळ कमीच! त्यात आमचा ग्रुप मॅड कोणता खेळ खेळायचा हे ठरवता ठरवता अक्कड बक्कड बंबे बो अस्सी नब्बे पुरे ...असे म्हणेपर्यंत मधली सुट्टी संपायचे टोल पडायचे आणि मग तुझ्यामुळे.. तुझ्यामुळे.. असं तू तू मी मी करत सगळे परत वर्गात!
            पुढे पुढे हीच मधली सुट्टी गृहपाठ राहिलाय....कार्यानुभवच चिकटकाम  करायचं म्हणत संपून जायची.सणांचे दिवस जवळ आले की मधली सुट्टी नेहमीच कमी वाटायची..एका हातात घोटीव कागद,दुसऱ्या हातात जोकरचा गम,बाकावर पसरलेलं सामान यात डबा कधी कधी राहून जायचा (नेमकी याच दिवशी नावडती भाजी असायची डब्यात) घरी गेल्यावर आई रागवायची  आणि संध्याकाळी मात्र वेगळीच भाजी ताटात वाढायची (ही मात्र माझी आवडती भाजी) ;हे मला फार उशीरा कळलं. 
एकदा शाळेतर्फेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे सहल जाणार आहे;असं सांगितलं गेल. मी बाईंना विचारलं बाई, उद्यान म्हणजे बाग का हो? बाई हसून म्हणाल्या,''हो पण मोठ्ठी बाग हं! मला वाटल;जस मोठ्ठ नाव तश्शीच मोठ्ठी बाग ..नक्कीच इकडे जवळ नाही बुवा! डबा खाताना श्पेशल ग्रुपची हीssss चर्चा...कोण म्हणाल अरे ते न मोठ्ठ आहे एकदम....पण संजय का?आमच्या वर्गात एका मुलाच्या वडलांच नाव होत संजय..त्याला आणि आम्हाला इतकं छान वाटत राहिलं..म्हणजे याच्या बाबांच्या नाव आणि उद्यानाच नाव सेम टू सेम!! जेव्हा तिथे गेलो तेव्हा समजलं, हेच ते मोठ्ठ नाव..कित्ती लांब.... आम्ही मॅड..कायच्या कायच विचार!    
        मोठ्या शाळेत मधली सुट्टी होण्याची मोठ्ठी बेल वाजवली जायची ट्रीssssssन्ग आणि आम्ही तास संपल्याच्या आनंदात चुळबुळ करायचो. किंबहुना बेल वाजायची वाट बघत बसायचो...नागरिकशास्त्र किंवा भूगोल यासारखे 'जांभई विषय' सुरु असले की मधल्या सुट्टीची चाहूल ५-१० मिनिट आधीच लागत असे आमची चुळबूळ मॅडम शांतपणे सहन करायच्या. सगळा वर्ग जेव्हा यात सहभागी असे तेव्हा मात्र का कोण जाणे आणखी ५ मिनिट तास लांबायाचा...आणि गप्प राहण्यावाचून गत्यंतर नसे; न जाणो; आणखी १० मिनिट शिकवत बसल्या तर?? मोठ्या शाळेतली मधली सुट्टी म्हणजे जास्त धमाल असे. एकतर आम्ही शाळेच्या मैदानावर खेळत असू किंवा मस्त गप्पा मारत असू. गप्पांचे विषय काहीही असत त्यात कधी येत्या स्नेहसंमेलनासाठी काय काय करायचं याच प्लानिंग करत असू. आमच्या वर्गात अनेकजण कलाकार होते. नुकताच नवी नवी चित्र रेखाटायचा छंद अनेकांना लागला होता. इतक गुंग होऊन चित्र काढण सुरु असायचं की डबा खाण हे 'अर्रे राहिलंच'वाली गोष्ट! मध्ल्या सुटीआधीचा तास जर चुकून ऑफ असेल तर मग धमालच! फुली-गोळा,बाकावर नाव कोरणे असे अनेक पराक्रम सुरु असायचे..
      माझी एक मैत्रीण डब्यात मक्याची खिचडी आणायची; माझ्यासाठी थोडी जास्तीची मला आवडते म्हणून..! अशा वेळी डबा वाटून खाण पर्वणी असे!शिवाय  शाळेतल्या वडापाव आणि सामोसापावची चव तर न्यारीच ....असं काय वेगळेपण होत बर? हं..कदाचित आपला खास चमू सोबत असताना एक वडापाव ३-४ जणांसोबत खाताना जास्त गंमत वाटते.       आमच्या ग्रुपने एकदा ठरवलं कि मधल्या सुटील नव्या डान्स ची तालीम करायची; झाल...दर मधल्या सुट्टीत हे नवं खूळ सुरु झाल...नंतर मध्येच नाटकाचीही टूम निघाली होती..'बोक्या सातबंडे' भन्नाट सुरु होत. आम्ही त्यातले निवडक (आम्हाला पेलतील असे भाग) सादर करायचो. आता आठवल तरी हसू येतंय मधल्या सुटीत रंगणाऱ्या गाण्याच्या भेंड्या,खो/खो /डॉजबॉलखेळता खेळता मधली सुट्टी किती कमी वेळ असते असं पण वाटायचं. मधल्या सुटीत कोणी  पुस्तक वाचताना दिसलं की वाटायचं.... मधल्या सुट्टीत पुस्तक-वाचन म्हणजे किती मौल्यवान वेळ वाया जातो यार..? पण राहिलेला वर्गपाठ/गृहपाठ  पूर्ण करण्यासाठी किंवा पाठांतर करण्यासाठी मात्र 'मधली सुट्टीच' दिलासा देउन जायची. फक्त ज्या विषयाचा गृहपाठ राहिलाय तो तास मधल्या सुटीनंतर असायला हवा राव नाहीतर ओम फस्स!
        कधी विज्ञान प्रकल्पाच्या विषयावर आमचं गंभीर चिंतन चालायचं....तर कधी नाट्य स्पर्धेतील डायलॉगच पाठांतर...मधली सुट्टी संपता संपता जाणवायचं; किती लौक्कर संपली आज मधली सुट्टी! डबा खायला विसरले  झालं; आता काही घरी खैर नाही.. घरी जाताना बसमध्येच बकाणे भरले जायचे अशावेळी.गाणी म्हणण आणि मराठी कवितांना चाल लावण हा आणखी एक नवा उद्योग सुरु झाला होता ...६ वी -७ वी पासून ! सर्वात्मका शिवसुंदरा...ते ओळखलंत का सर मला..पर्यंत वेगवेगळे प्रयत्न केले जायचे.  संस्कृत ची पदसुद्धा याला अपवाद नव्हती. चाल बसली की पाठांतर पटकन होत ना       मुलं/मुली कोणाचीही मॅच असली की मधली सुट्टी म्हणजे जल्लोषासाठीचा वेळ! पूर्ण सुटीत वर्ग डोक्यावर घ्यायचा.धिंगाणाच म्हणा न!'शाळेत बेस्ट आहे कोण? 'अ' ची मुल आणखी कोण? चा नारा दुमदुमायचा. कोणी सुरेल गातंय कोणी तितक्याच सुरात बाकं बडवून त्यांना साथ देतंय असं बरंच मॅड मॅड सुरु असायचं. सगळे मॅड आधीच्या तासाला कोणाला शिक्षा झाली असेल तर मधल्या सुट्टीच्या सुरुवातीला भयंकर शांतता असे.अचानक कोणालातरी हुरूप यायचा अतिशय कडक असणाऱ्या कुलकर्णी सरांच्या /दळवी मॅडमचा आवेश आणून तो/ती फळ्यासमोर जात आणि खुबीने त्यांच सोंग वठवत. शिक्षा झालेल्या विद्यार्थ्याच्या डोळ्यात पाणी येईपर्यन्त तो हसत राही आणि मधल्या सुट्टीच वातावरण पुन्हा खेळकर होऊन जाई. आणि चुकून कोणी चुगली केलीच तर राव खेळ खतम! संपूर्ण वर्ग बहिष्कार टाकणार;म्हणजे त्याला कोपच्यातच ठेवणार पुन्हा चहाड्या करताना १०० वेळा विचार करेल पठ्ठ्या  असा धडा मिळायचा!

         क्रिकेट, टि.व्ही मालिका,पुस्तक,चित्रपट,हिरो,सुपरहिरो,हिरोईन हे अत्यंत आवडीने चर्चिले जाणारे विषय!! आणि काय होणार याचे भन्नाट मौलिक अंदाज बांधले जात काय काय कल्पना लढवायचो एकेक!! अहमहमिका लागायची नुसती! पण मधली सुट्टी रंगतदार होऊन जायची. मधूनच लहर आली तर उगाचच खोड्या काढण्यासाठी कोणाच्यातरी वहीवर काहीबाही लिहील जात असे मग भांडण,रडारड सगळ साग्रसंगीत पार पडल की,''कध्धी कध्धी म्हणून बोलू नको'' असं म्हणत घेतलेली कट्टी दोन-तीन दिवसानंतर बट्टीत कधी बदलत असे ते कळायचंसुद्धा  नाही बट्टीसाठी कारणीभूत पुन्हा मधली सुट्टीच!
        वरच्या वर्गातल्या मुलांच्या मारामाऱ्या आणि दोन गटात होणारी भांडणासाठीसुद्धा हाच एक मुहूर्त असे. भांडा पठ्ठे हो! आम्ही आपलं कोण चूक कोण बरोबर हे ठरवत बसायचो... कारण माहित नसताना मॅडमधली सुट्टी असं मॅड करण्यासाठीच असायची.एखाद्या शिरोडकर किंवा जोशीला गप्पा मारता मारता statue करायला तर  कोण आनंद होत असे  ;)
     कॉलेजमध्ये कट्टा म्हणजे स्वयंघोषित'बंक' असतो ;आणखी मोठ्ठ झाल्यावर 'लंच ब्रेक' किंवा'ब्रेक' होतो. शाळेतली मधली सुट्टी थोड्याफार प्रमाणात रूप पालटत जाते. 
     मधल्या सुट्टीतला मोकळेढाकळेपणा आता जरा पोशाखी बनत चाललाय;भाजी-पोळीचा शाळेतला 'स्टीलचा- श्पेशल माझा डबा' स्पेशल टप्परवेअरच्या रंगीत वेष्टनात बंदिस्त होतोय! वर्षातून एकच मोठ्ठी मधली सुट्टी मिळतेय धमाल करण्यासाठी.. मॅडच सगळ..

Monday, May 21, 2012

अजि म्या काव्य अनुभवले...

       We -चार हा मकरंद सावंत (सोफ्टवेअर इंजिनियर),मंदार चोळकर (ग्राफिक     डिझायनर ),प्राजक्त देशमुख (उद्योजक ),समीर  सामंत(बँकर) चार अवलियांचा अनोखा कार्यक्रम आहे..कारण त्यांच्याच शब्दात सांगायचं तर हा काव्यवाचनाचा कार्यक्रम नाही तर इथे वेगवेगळ्या विषयांवर कवितांच्या माध्यमातून संवाद साधला जातो. इथे कवितांना विषयांचे आणि भाषेचे बंधन नाही.

      गेले कित्येक महिने मी 'We -चार' पाहीन पाहीन असं म्हणत कार्यक्रमाला जाणं  सारखं लांबणीवर पडत होत. यावेळी निश्चय करून जायचंच असं ठरवलं आणि 
१९ मे २०१२ रोजी प्रबोधनकार ठाकरे, बोरीवली येथे भरलेली ही कवितांची मैफिल अनुभवली. म्हणजे खर  तर कार्यक्रमाचं नावच होत...We -चार lyrically miracle !
       विचार विचारातून आकारास आलेला आणि मंदार चोळकर,प्राजक्त देशमुख, समीर सामंत आणि मकरंद सावंत या काव्याळ चौकडीच्या सहजस्फूर्त प्रतिभेचा आविष्कार.. 'We -चार' अतिशय साधेपणाने सादर होतो आणि प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून जातो. 
      बासरीच्या प्रसन्न सुरावटीने झालेली सुरुवात निराळाच माहोल निर्माण करते आणि दिवसभराच्या भोवऱ्यात आणि रहाटगाडग्यात  अडकलेलं मन हा ताजाटवटवीत अनुभव घेण्यासाठी सरसावत ... खट्याळ,तरल,आशयगर्भ,उत्कट ..अशा कविता मंचावरून सादर केल्या जातात...आत आत खोलवर या चौघांच्याही कविता रुजत जातात..किंवा असंही म्हणता येईल; जणू काही थेट मेंदूच्या पटलावर कोरलं जात...एक लयबद्ध शब्दमय  शिल्प! 
      आकाश ,फुलं,बालपण ,पाऊस,चळवळ ,माणसं,तो..ती..  वेगवेगळ्या कवितेतून आपल्याला भेटतच असतात दरवेळी.. पण' We -चार' मधील प्रत्येक कविता या सगळ्यापलीकडे जाउन निसर्गाला,नेहमीच्या घडामोडींना तसाच वस्तुस्थितीला प्रगल्भ परिमाण देते. हा जो अनुभव या कार्यक्रमादरम्यान येत राहतो ते या कवितांमागच गमक आहे. शिवाय कविता सादर होते ते 'आम्ही चार तर एकाच नावेतले प्रवासी' असल्यासारखी..कधी एकमेकांची थट्टा करत  कधी प्रेक्षकांनाच कवितेत सामावून घेत  हा काव्यवाचनाचा कार्यक्रम ;फक्त कविता न राहता एक अनोखा संवाद बनून अगदी सहज वेगळीच उंची गाठतो... (जिथपर्यंत पोहोचण हे चौघेच जाणोत )
          We -चार ऐकत असताना  कागदावर सहजच म्हणून सुचलेलं ...लिहिलेलं..असं काही; माणसातल्या माणूसपणाला कधी गलबलून टाकत ..जागे करत ..प्रश्न विचारत...हसवत ...हळवं करत... ..प्रसन्न करत.....असं बरंच काही होतं राहत आणि ते काय हे शब्दात मांडण माझ्यासारख्या सामान्य माणसाला कठीण आहे   कारण We -चार संपल्यानंतर परतताना कितीतरी वेळ या चौघांच्या शब्दिक जादूने मन भारलेलं होत . स्वतःचाच स्वतःशी नि:शब्द संवाद सुरु होता .. कारण  मनात बरच काही सुरु असतं 
अशा वेळी ..कदाचित यालाच 'अनुभवण' म्हणतात... 
        नेहमी असं म्हटलं जात...मन,मेंदू आणि मनगट या तीन गोष्टी एकत्र असल्या की यश आपसूकच धावत येत! 'We -चार'च यश असंच  आहे. मन,मेंदू यावर त्यांच्या शब्दांची जादू असतेच पण मनगटसुद्धा म्हणतं चला अनुभव मांडूयाच ...
     तर.. माझ्या मनगटाने  ह्या अनुभवाबद्दल या पोस्टमध्ये थोड आणखी लयबद्ध व्हावं असा माझ्या स्वच्छंदी  मनाचा आग्रह आहे.. मेंदू अजून  त्याच दुनियेत आहे[ कारण मी 'We -चार'चा  (ब्लॉगर्स च्या भाषेत ) गरगर फिरणारा पंखा  झाले आहे :)  म्हटलं चला थोडं लिहुयाच; म्हणून (मंदार,प्राजक्त,समीर आणि मकरंद या तिघांचीही माफी मागून) थोडं  धाडस करतेय...

तरल संवेदना मधुनी बहरतो..  बरसतो मकरंद 
अल्लड खट्याळ शब्दात रुजे.. मंदार मुक्तछंद 
गझल शायरी  लीलया पेरतो.. समीर शब्दासक्त
शब्दातून भवताल वेचतो....ओघळतो प्राजक्त! 
ता.क.: मी पहिल्यांदाच एक सही घेतली आहे तो फोटो येथे पोस्ट करत  आहे



         


  प्राजक्त देशमुख, खूप आभार! (पुढल्या वेळी चारही जणांच्या सह्या हव्या आहेत मला)




  We -चार च्या पुढील प्रत्येक प्रयोगासाठी खूप खूप शुभेच्छा!!:)