Monday, May 21, 2012

अजि म्या काव्य अनुभवले...

       We -चार हा मकरंद सावंत (सोफ्टवेअर इंजिनियर),मंदार चोळकर (ग्राफिक     डिझायनर ),प्राजक्त देशमुख (उद्योजक ),समीर  सामंत(बँकर) चार अवलियांचा अनोखा कार्यक्रम आहे..कारण त्यांच्याच शब्दात सांगायचं तर हा काव्यवाचनाचा कार्यक्रम नाही तर इथे वेगवेगळ्या विषयांवर कवितांच्या माध्यमातून संवाद साधला जातो. इथे कवितांना विषयांचे आणि भाषेचे बंधन नाही.

      गेले कित्येक महिने मी 'We -चार' पाहीन पाहीन असं म्हणत कार्यक्रमाला जाणं  सारखं लांबणीवर पडत होत. यावेळी निश्चय करून जायचंच असं ठरवलं आणि 
१९ मे २०१२ रोजी प्रबोधनकार ठाकरे, बोरीवली येथे भरलेली ही कवितांची मैफिल अनुभवली. म्हणजे खर  तर कार्यक्रमाचं नावच होत...We -चार lyrically miracle !
       विचार विचारातून आकारास आलेला आणि मंदार चोळकर,प्राजक्त देशमुख, समीर सामंत आणि मकरंद सावंत या काव्याळ चौकडीच्या सहजस्फूर्त प्रतिभेचा आविष्कार.. 'We -चार' अतिशय साधेपणाने सादर होतो आणि प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून जातो. 
      बासरीच्या प्रसन्न सुरावटीने झालेली सुरुवात निराळाच माहोल निर्माण करते आणि दिवसभराच्या भोवऱ्यात आणि रहाटगाडग्यात  अडकलेलं मन हा ताजाटवटवीत अनुभव घेण्यासाठी सरसावत ... खट्याळ,तरल,आशयगर्भ,उत्कट ..अशा कविता मंचावरून सादर केल्या जातात...आत आत खोलवर या चौघांच्याही कविता रुजत जातात..किंवा असंही म्हणता येईल; जणू काही थेट मेंदूच्या पटलावर कोरलं जात...एक लयबद्ध शब्दमय  शिल्प! 
      आकाश ,फुलं,बालपण ,पाऊस,चळवळ ,माणसं,तो..ती..  वेगवेगळ्या कवितेतून आपल्याला भेटतच असतात दरवेळी.. पण' We -चार' मधील प्रत्येक कविता या सगळ्यापलीकडे जाउन निसर्गाला,नेहमीच्या घडामोडींना तसाच वस्तुस्थितीला प्रगल्भ परिमाण देते. हा जो अनुभव या कार्यक्रमादरम्यान येत राहतो ते या कवितांमागच गमक आहे. शिवाय कविता सादर होते ते 'आम्ही चार तर एकाच नावेतले प्रवासी' असल्यासारखी..कधी एकमेकांची थट्टा करत  कधी प्रेक्षकांनाच कवितेत सामावून घेत  हा काव्यवाचनाचा कार्यक्रम ;फक्त कविता न राहता एक अनोखा संवाद बनून अगदी सहज वेगळीच उंची गाठतो... (जिथपर्यंत पोहोचण हे चौघेच जाणोत )
          We -चार ऐकत असताना  कागदावर सहजच म्हणून सुचलेलं ...लिहिलेलं..असं काही; माणसातल्या माणूसपणाला कधी गलबलून टाकत ..जागे करत ..प्रश्न विचारत...हसवत ...हळवं करत... ..प्रसन्न करत.....असं बरंच काही होतं राहत आणि ते काय हे शब्दात मांडण माझ्यासारख्या सामान्य माणसाला कठीण आहे   कारण We -चार संपल्यानंतर परतताना कितीतरी वेळ या चौघांच्या शब्दिक जादूने मन भारलेलं होत . स्वतःचाच स्वतःशी नि:शब्द संवाद सुरु होता .. कारण  मनात बरच काही सुरु असतं 
अशा वेळी ..कदाचित यालाच 'अनुभवण' म्हणतात... 
        नेहमी असं म्हटलं जात...मन,मेंदू आणि मनगट या तीन गोष्टी एकत्र असल्या की यश आपसूकच धावत येत! 'We -चार'च यश असंच  आहे. मन,मेंदू यावर त्यांच्या शब्दांची जादू असतेच पण मनगटसुद्धा म्हणतं चला अनुभव मांडूयाच ...
     तर.. माझ्या मनगटाने  ह्या अनुभवाबद्दल या पोस्टमध्ये थोड आणखी लयबद्ध व्हावं असा माझ्या स्वच्छंदी  मनाचा आग्रह आहे.. मेंदू अजून  त्याच दुनियेत आहे[ कारण मी 'We -चार'चा  (ब्लॉगर्स च्या भाषेत ) गरगर फिरणारा पंखा  झाले आहे :)  म्हटलं चला थोडं लिहुयाच; म्हणून (मंदार,प्राजक्त,समीर आणि मकरंद या तिघांचीही माफी मागून) थोडं  धाडस करतेय...

तरल संवेदना मधुनी बहरतो..  बरसतो मकरंद 
अल्लड खट्याळ शब्दात रुजे.. मंदार मुक्तछंद 
गझल शायरी  लीलया पेरतो.. समीर शब्दासक्त
शब्दातून भवताल वेचतो....ओघळतो प्राजक्त! 
ता.क.: मी पहिल्यांदाच एक सही घेतली आहे तो फोटो येथे पोस्ट करत  आहे



         


  प्राजक्त देशमुख, खूप आभार! (पुढल्या वेळी चारही जणांच्या सह्या हव्या आहेत मला)




  We -चार च्या पुढील प्रत्येक प्रयोगासाठी खूप खूप शुभेच्छा!!:) 

4 comments:

  1. धन्यवाद....एकेक शब्दाने आम्हाला एक-एक बुधली शाई दिलीय नव्या कविता लिहायला ...
    असाच लोभ राहु दे...
    परत धन्यवाद !

    ReplyDelete
    Replies
    1. प्राजक्त, सगळ्यात आधी; प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार!
      आणि तुम्ही असेच व्यक्त होत ,बरसत,ओघळत() राहा बाकी शुभेच्छा तर असणारच अगदी आभाळभर!

      Delete
  2. सही गं....आणि पहिलीच प्रतिक्रिया पण प्राजक्तची....और क्या कहने....:)

    ReplyDelete
    Replies
    1. अपर्णा, खरंय! अनपेक्षित सुखद धक्का वगैरे म्हणतात तसं वाटतंय! :)

      Delete