Saturday, May 26, 2012

मधली सुट्टी आणि धमाल!


             शाळेत असताना नेहमी तास संपल्याच्या वेळेव्यतिरिक्त खास बेल होत असे! मधल्या सुट्टीची :) 
मधली सुट्टी म्हटलं की डोळ्यासमोर येतो आईने करून दिलेला डबा आणि दोस्तमंडळींसोबत केलेली धमाल.
लहान असताना शाळेत जाण म्हणजे  गम्मत वाटायची. आपल्यासारखेच सगळे मॅड! कोणी अगदीच शांत तर कोणी उगाच खोड्या काढणार ,कोणी रडक ,कोणी मस्त गमतीदार...सगळंच नवीन...आणि कोवळही .बालवर्गात प्रवेश झाल्यानंतर शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली 'वदनी कवळ घेता....अशी साग्रसंगीत सुरुवात करून' डबे खायला सुरुवात केली होती.नंतर नंतर 'श्पेशल'  बाळांचा ग्रुप डबा खायला बसायचा..एकत्र! :) 

           कोणी काय काय खाऊ आणला आहे ते पाहिलं जायचं. नावडती भाजी-आवडती भाजी ची देवाणघेवाण व्हायची...आईने केलेला खास डबा बरेच वेळा  जास्त असायचा. सगळ्यांना वाटून खा;आई सांगायची... मी मॅड सगळ्यांना वाटून काही उरलं तरच खायचे....कारण आईने सगळ्यांना वाटून खायला सांगितलेलं आहे न...बालवर्गात मधल्या सुट्टीत खेळ पण खेळले  जायचे कधी पकडापकडी,लपाछुपी (हा सगळ्यात गमतीदार खेळ) सुरुवातीला भरपूर भूक लागल्याने कधी एकदा मधल्या सुटीचे टोल पडतील आणि डबा सगळ्यांना वाटतेय आणि खातेय  असं व्हायचं..नंतर डबा राहिला आणि कधी एकदा खेळायला मिळतंय याची वाट पाहायचो कारण खेळाच्या तासाला व्यायाम जास्त...'श्पेशल' खेळ कमीच! त्यात आमचा ग्रुप मॅड कोणता खेळ खेळायचा हे ठरवता ठरवता अक्कड बक्कड बंबे बो अस्सी नब्बे पुरे ...असे म्हणेपर्यंत मधली सुट्टी संपायचे टोल पडायचे आणि मग तुझ्यामुळे.. तुझ्यामुळे.. असं तू तू मी मी करत सगळे परत वर्गात!
            पुढे पुढे हीच मधली सुट्टी गृहपाठ राहिलाय....कार्यानुभवच चिकटकाम  करायचं म्हणत संपून जायची.सणांचे दिवस जवळ आले की मधली सुट्टी नेहमीच कमी वाटायची..एका हातात घोटीव कागद,दुसऱ्या हातात जोकरचा गम,बाकावर पसरलेलं सामान यात डबा कधी कधी राहून जायचा (नेमकी याच दिवशी नावडती भाजी असायची डब्यात) घरी गेल्यावर आई रागवायची  आणि संध्याकाळी मात्र वेगळीच भाजी ताटात वाढायची (ही मात्र माझी आवडती भाजी) ;हे मला फार उशीरा कळलं. 
एकदा शाळेतर्फेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे सहल जाणार आहे;असं सांगितलं गेल. मी बाईंना विचारलं बाई, उद्यान म्हणजे बाग का हो? बाई हसून म्हणाल्या,''हो पण मोठ्ठी बाग हं! मला वाटल;जस मोठ्ठ नाव तश्शीच मोठ्ठी बाग ..नक्कीच इकडे जवळ नाही बुवा! डबा खाताना श्पेशल ग्रुपची हीssss चर्चा...कोण म्हणाल अरे ते न मोठ्ठ आहे एकदम....पण संजय का?आमच्या वर्गात एका मुलाच्या वडलांच नाव होत संजय..त्याला आणि आम्हाला इतकं छान वाटत राहिलं..म्हणजे याच्या बाबांच्या नाव आणि उद्यानाच नाव सेम टू सेम!! जेव्हा तिथे गेलो तेव्हा समजलं, हेच ते मोठ्ठ नाव..कित्ती लांब.... आम्ही मॅड..कायच्या कायच विचार!    
        मोठ्या शाळेत मधली सुट्टी होण्याची मोठ्ठी बेल वाजवली जायची ट्रीssssssन्ग आणि आम्ही तास संपल्याच्या आनंदात चुळबुळ करायचो. किंबहुना बेल वाजायची वाट बघत बसायचो...नागरिकशास्त्र किंवा भूगोल यासारखे 'जांभई विषय' सुरु असले की मधल्या सुट्टीची चाहूल ५-१० मिनिट आधीच लागत असे आमची चुळबूळ मॅडम शांतपणे सहन करायच्या. सगळा वर्ग जेव्हा यात सहभागी असे तेव्हा मात्र का कोण जाणे आणखी ५ मिनिट तास लांबायाचा...आणि गप्प राहण्यावाचून गत्यंतर नसे; न जाणो; आणखी १० मिनिट शिकवत बसल्या तर?? मोठ्या शाळेतली मधली सुट्टी म्हणजे जास्त धमाल असे. एकतर आम्ही शाळेच्या मैदानावर खेळत असू किंवा मस्त गप्पा मारत असू. गप्पांचे विषय काहीही असत त्यात कधी येत्या स्नेहसंमेलनासाठी काय काय करायचं याच प्लानिंग करत असू. आमच्या वर्गात अनेकजण कलाकार होते. नुकताच नवी नवी चित्र रेखाटायचा छंद अनेकांना लागला होता. इतक गुंग होऊन चित्र काढण सुरु असायचं की डबा खाण हे 'अर्रे राहिलंच'वाली गोष्ट! मध्ल्या सुटीआधीचा तास जर चुकून ऑफ असेल तर मग धमालच! फुली-गोळा,बाकावर नाव कोरणे असे अनेक पराक्रम सुरु असायचे..
      माझी एक मैत्रीण डब्यात मक्याची खिचडी आणायची; माझ्यासाठी थोडी जास्तीची मला आवडते म्हणून..! अशा वेळी डबा वाटून खाण पर्वणी असे!शिवाय  शाळेतल्या वडापाव आणि सामोसापावची चव तर न्यारीच ....असं काय वेगळेपण होत बर? हं..कदाचित आपला खास चमू सोबत असताना एक वडापाव ३-४ जणांसोबत खाताना जास्त गंमत वाटते.       आमच्या ग्रुपने एकदा ठरवलं कि मधल्या सुटील नव्या डान्स ची तालीम करायची; झाल...दर मधल्या सुट्टीत हे नवं खूळ सुरु झाल...नंतर मध्येच नाटकाचीही टूम निघाली होती..'बोक्या सातबंडे' भन्नाट सुरु होत. आम्ही त्यातले निवडक (आम्हाला पेलतील असे भाग) सादर करायचो. आता आठवल तरी हसू येतंय मधल्या सुटीत रंगणाऱ्या गाण्याच्या भेंड्या,खो/खो /डॉजबॉलखेळता खेळता मधली सुट्टी किती कमी वेळ असते असं पण वाटायचं. मधल्या सुटीत कोणी  पुस्तक वाचताना दिसलं की वाटायचं.... मधल्या सुट्टीत पुस्तक-वाचन म्हणजे किती मौल्यवान वेळ वाया जातो यार..? पण राहिलेला वर्गपाठ/गृहपाठ  पूर्ण करण्यासाठी किंवा पाठांतर करण्यासाठी मात्र 'मधली सुट्टीच' दिलासा देउन जायची. फक्त ज्या विषयाचा गृहपाठ राहिलाय तो तास मधल्या सुटीनंतर असायला हवा राव नाहीतर ओम फस्स!
        कधी विज्ञान प्रकल्पाच्या विषयावर आमचं गंभीर चिंतन चालायचं....तर कधी नाट्य स्पर्धेतील डायलॉगच पाठांतर...मधली सुट्टी संपता संपता जाणवायचं; किती लौक्कर संपली आज मधली सुट्टी! डबा खायला विसरले  झालं; आता काही घरी खैर नाही.. घरी जाताना बसमध्येच बकाणे भरले जायचे अशावेळी.गाणी म्हणण आणि मराठी कवितांना चाल लावण हा आणखी एक नवा उद्योग सुरु झाला होता ...६ वी -७ वी पासून ! सर्वात्मका शिवसुंदरा...ते ओळखलंत का सर मला..पर्यंत वेगवेगळे प्रयत्न केले जायचे.  संस्कृत ची पदसुद्धा याला अपवाद नव्हती. चाल बसली की पाठांतर पटकन होत ना       मुलं/मुली कोणाचीही मॅच असली की मधली सुट्टी म्हणजे जल्लोषासाठीचा वेळ! पूर्ण सुटीत वर्ग डोक्यावर घ्यायचा.धिंगाणाच म्हणा न!'शाळेत बेस्ट आहे कोण? 'अ' ची मुल आणखी कोण? चा नारा दुमदुमायचा. कोणी सुरेल गातंय कोणी तितक्याच सुरात बाकं बडवून त्यांना साथ देतंय असं बरंच मॅड मॅड सुरु असायचं. सगळे मॅड आधीच्या तासाला कोणाला शिक्षा झाली असेल तर मधल्या सुट्टीच्या सुरुवातीला भयंकर शांतता असे.अचानक कोणालातरी हुरूप यायचा अतिशय कडक असणाऱ्या कुलकर्णी सरांच्या /दळवी मॅडमचा आवेश आणून तो/ती फळ्यासमोर जात आणि खुबीने त्यांच सोंग वठवत. शिक्षा झालेल्या विद्यार्थ्याच्या डोळ्यात पाणी येईपर्यन्त तो हसत राही आणि मधल्या सुट्टीच वातावरण पुन्हा खेळकर होऊन जाई. आणि चुकून कोणी चुगली केलीच तर राव खेळ खतम! संपूर्ण वर्ग बहिष्कार टाकणार;म्हणजे त्याला कोपच्यातच ठेवणार पुन्हा चहाड्या करताना १०० वेळा विचार करेल पठ्ठ्या  असा धडा मिळायचा!

         क्रिकेट, टि.व्ही मालिका,पुस्तक,चित्रपट,हिरो,सुपरहिरो,हिरोईन हे अत्यंत आवडीने चर्चिले जाणारे विषय!! आणि काय होणार याचे भन्नाट मौलिक अंदाज बांधले जात काय काय कल्पना लढवायचो एकेक!! अहमहमिका लागायची नुसती! पण मधली सुट्टी रंगतदार होऊन जायची. मधूनच लहर आली तर उगाचच खोड्या काढण्यासाठी कोणाच्यातरी वहीवर काहीबाही लिहील जात असे मग भांडण,रडारड सगळ साग्रसंगीत पार पडल की,''कध्धी कध्धी म्हणून बोलू नको'' असं म्हणत घेतलेली कट्टी दोन-तीन दिवसानंतर बट्टीत कधी बदलत असे ते कळायचंसुद्धा  नाही बट्टीसाठी कारणीभूत पुन्हा मधली सुट्टीच!
        वरच्या वर्गातल्या मुलांच्या मारामाऱ्या आणि दोन गटात होणारी भांडणासाठीसुद्धा हाच एक मुहूर्त असे. भांडा पठ्ठे हो! आम्ही आपलं कोण चूक कोण बरोबर हे ठरवत बसायचो... कारण माहित नसताना मॅडमधली सुट्टी असं मॅड करण्यासाठीच असायची.एखाद्या शिरोडकर किंवा जोशीला गप्पा मारता मारता statue करायला तर  कोण आनंद होत असे  ;)
     कॉलेजमध्ये कट्टा म्हणजे स्वयंघोषित'बंक' असतो ;आणखी मोठ्ठ झाल्यावर 'लंच ब्रेक' किंवा'ब्रेक' होतो. शाळेतली मधली सुट्टी थोड्याफार प्रमाणात रूप पालटत जाते. 
     मधल्या सुट्टीतला मोकळेढाकळेपणा आता जरा पोशाखी बनत चाललाय;भाजी-पोळीचा शाळेतला 'स्टीलचा- श्पेशल माझा डबा' स्पेशल टप्परवेअरच्या रंगीत वेष्टनात बंदिस्त होतोय! वर्षातून एकच मोठ्ठी मधली सुट्टी मिळतेय धमाल करण्यासाठी.. मॅडच सगळ..

9 comments:

  1. मस्त गं...
    माझी शाळा घराच्या जवळ होती त्यामुळे आम्ही भावंड घरीच जाऊन जेवायचो..ही मजा मग कॉलेजला गेल्यावर घेतली...:)

    ReplyDelete
    Replies
    1. प्रणाली विलास पाटील

      Delete
  2. मोठ्या शाळेत मधल्या सुट्टीत...
    aamhi ek tar मधल्या सुट्टी chya adhich डबा khat asu..
    kiva.. within 5 min..mhanje purn 30 min मोकाट...
    शाळेच्या मैदानावर  धमाल time management ... muli pahnya sathipan khoop vel milayacha (ye andar ki baat hai...) ... n
    मधल्या सुट्टीत  मुलांच्या मारामाऱ्या
    mhanaje WWE ch..Full on Entertainment ...
    Atta Office madhey fakt 'लंच ब्रेक' किंवा' Coffee ब्रेक' jo kadhi hi ani kiti vela pan ghevu shakato.. :p

    ReplyDelete
  3. मधल्या सुट्टीत... vajavale jaanare बाकं ani tyan chya jodila Compass Box, स्टीलचा डबा' ani स्टीलचा Spoon , Deadly combination ... ACDC / Metallica cha Feel deven jaayche

    ReplyDelete
    Replies
    1. WWE;Metallica cha Feel?परेश,धमाल रे!

      Delete
  4. chanach pallu..mala pan te divas athavle...........asech chan vishay lihit ja..............

    ReplyDelete
  5. प्रणाली विलास पाटील

    ReplyDelete