Friday, July 13, 2012

ज्याचा त्याचा पाऊस-१



१: 
पाऊस मला आवडतो;मज्जा नुसती! चपक ठपक ठपक  करत चालायचं  रस्त्याने ...पाणी उडवत; एक - दुसऱ्यावर.. रेनकोट,दप्तर असं सगळ तयार होऊन जायचं आणि खेळायचं मज्जा मज्जा! यावेळी मी आईला म्हटलं होत छत्री हवीये पण भिजते न मी आणि आजारी पडते(असं आई म्हणते) यावर्षी छत्री नाही. मी हायस्कूलमध्ये गेल्यावर छत्रीच घेणारेय..आम्ही सहाजण नं..म्हणजे मी,अदिती,रंजन,सुरभी,पंचमी,शार्दुल आम्ही नं सगळे एकदम धम्माल करतो रस्त्याने येताना! मुद्दाम भिजतो आणि खूप खूप हसतो.. एकदम मोठ्या मोठ्याने असं वर बघायचं पाऊस आ करून खायचा आणि पुन्हा हसायचं शाळेतून येताना पाऊस असला कि मज्जा मज्जा सगळी
२.
मला नं पावसात भिजायला आवडत! असं वाटत पाऊस रुजत राहावा फक्त आपल्यात संपूच नये! प्रसन्न वाटत अगदी :)
३.
पाऊस म्हणजे मातीचा सुगंध...काहीजण उगाच वास वगैरे म्हणतात बावळटासारखे. एकजात मूर्ख! गंध गं गंध!! श्वासात भरून घ्यावा इतका निर्मळ...आणि सुखद! वास म्हणे.. वेडे एकजात सगळे
४. 
उगाच नाही कवी लोक कविता वगैरे लिहित पावसावर...एकीकडे पाऊस सुरु असतो आणि एकीकडे कवींच्या कविता. पाऊस म्हणजे न देणगी आहे ग...किती बोलाव संपता संपत नाही. लहान बाळ,शाळेत जाणार मूल, तरुण,वयस्क,आजी आजोबा...सगळ्यांना आवडतो पाउस! ऋतूराज म्हटलं तर वावग ठरू नये. माझ्यापुरत सांगायचं झाल तर पाउस म्हणजे कधीही जुना न होणारा अनुभव आहे प्रत्येकासाठी...वेगळा आणि खास! शब्द अपुरे.. 
५.
पाऊस..एकदम स्पेशल ऋतू माझा.. तुला माहितेय,माझी आणि अनिशची भेट पावसातच झाली होती मस्त कुंद वगैरे म्हणतात न तसं वातावरण होतं ...आणि मी एकटीच चालले होते...वाटेत याने लिफ्ट देऊ केली होती...जेव्हा याच्यासोबत बसले तेव्हाच क्लिक झाला ग अनिश! त्यालाही तेव्हाच जाणवलं असाव कदाचित...पावसाने मला माझं बेस्ट माणूस दिलंय..तुलाही भेटेल बघ असाच कोणीतरी..
६. 
मला काही पावसाळा इतका आवडत नाही....चिखल सगळा...कित्ती ते पाणी...मस्त कोरड्या रस्त्यावर चालावं तर मध्येच हा येणार...मग छत्री उघडा आधी शोधा...असेल तर ठीक नाहीतर बोंबला..हे भिजत यायचं...थोडफार भिजलं ठीक आहे पण ऑफिसला जाताना आला  कि राग येतो ग खूप...दुष्टच वाटतो...घरी असले तर  पडावं नं पण नाही...असं कध्धीच होणार नाही...काही लोकांना पावसाळ्याच जरा जास्तच कौतुक असतं.म्हणजे असावं पण मला काही स्पेशल वगैरे वाटत नाही. हं मुंबईत पाणी टंचाई होऊ नये इतका पड आणि जा बाबा; धांदल उडवून फसवत जाऊ नको..
७.
पाऊस म्हणजे वाफाळता चहाचा कप आणि सोबत गाणी....अहाहा काय सांगू!! पाऊस म्हटलं कि जे फिलिंग येत न ते मुसळधार पावसात गरम चहाचा कप हाती ठेवून,मस्त खिडकीत बसून पाऊस नजरेत साठवून घेणाऱ्यालाच  ठाऊक! असं सांगून नाही कळायचं...
८.
पाऊस म्हटलं कि मला आपल कॉलेज आठवत गं...एकतर मस्त दाट हिरवळ असते सगळीकडे आणि आपला दंगा...चप्पल हातात घेऊन त्या वाहणाऱ्या पाण्यात चालायचं धमाल....नुसती... तुला माहितेय..ती कविता... सफेद घोड्यावर होऊन स्वार येईल कुठूनसा राजकुमार....पाऊस आपला राजकुमार म्हणजे माझा आणि तुझा...आभाळ बाबाला झाकोळून काळ्या-पांढऱ्या ढगांवर स्वार होत होत पाऊस बरसतो...आणि आणि कसं स्वच्छ  बरसण.. इथे कमी.. तिथे जास्त असं काही नाही पावसाच! असं कितीवेळा अनुभवलंय..हे घरात बसून पावसाचा आनंद लुटण वगैरे झूठ आहे ग सगळ...त्याच स्वागत करायचं नव्याने कारण दर वेळी तो नवीन असतो..मी तर मस्त घराबाहेर पडते...आता आईला पण सवय झालीये आता तिला माहितेय मी काही पावसात घरी थांबणार नाहीये ..मस्त मुक्त भटकायचं पावसात! प्रत्येक वेळी नव्याने भेटतो बघ पाऊस
९. 
पाऊस? किती बोलू आणि किती नको... तुला कल्पना नाहीये गेल्या वर्षी वर्षासहलीला गेलो होतो आम्ही धमाल..धमाल म्हणजे काय ते कळलं मला..अगं म्हणजे देणाऱ्याने देत जाव घेणाऱ्याने घेत जावे तसं मी फक्त आणि फक्त आनंद लुटत होते....त्यातून आमच्या ग्रुप मध्ये दोघे कवी होते काय सुंदर पाउस कविता ऐकवल्या त्यांनी दोन दिवस चिंब चिंब होऊन आलो आम्ही....मी शिरीषला पण सांगितलं होत बोअर होणार नाहीस आणि त्याने पण इतक एन्जोय केलाय...पाऊस!! मला तेव्हा वाटलं आपल्याकडे पाण्याचा पाऊस पडतोय ते बराच आहे ते बर्फ वगैरेचा पाऊस पडतो न त्यात असं न्हाऊन जाता येत नाही...पाऊस होऊन जातो आपण
१०.
पाऊस म्हणजे कवितांची मैफिल....म्हणजे माझी अशी कल्पना आहे कि पाऊस पडत असेल आणि जर कवीला कविता सुचत नसेल तर आयुष्य व्यर्थ ग...काहीच केल नाही असं म्हणेन मी..
पाऊस कसा का असेना रिमझिम,मुसळधार लेखणी लिहिती व्हायलाच हवी..आपण सगळे कसे कविता वाचत बसतो बर वाटत..भारलेल्या वातावरणात...पाऊस त्यात कविता....परमानंद।
११.
पावसात फूटबॉल खेळायचा तुफान,,,चिखलात! मस्त आम्ही सगळे फुल ओंन असतो खेळताना....डोक्याने टोलवायचा..आणि सुटायचं मैदानात झोकून द्यायचं सगळ्यांना शाळेचा ग्रूप आणि दुसरा एक पक्का फुटबॉलर्सचा ग्रुप आहे.अस्मानी तुफानी चा फील येतो..पाउस असेल तर.. मनसोक्त खेळायचं....पाऊस आपला पाठलाग करतो आपण त्याला निवांत त्याच काम करू द्यायचं आणि फुटबॉलवर मात्र आपलाच ताबा पाहिजे.. एकदम राजे आपण....आमच्यात गब्बू आहे न तो जाड्या गं..त्याला अस पळवतो म्हणून सांगू आम्ही.. ४ किलो वजन कमी झालंय त्याच खेळून खेळून.. गमतीचा भाग वेगळा पण खरच पावसामुळे जो उत्साह संचारतो नं तो वेगळाच असतो..फुटबॉल आणि पाऊस..हे अजब समीकरण आहे! 
१२.
पावसाबद्दल काय बोलनार ? उगा चेष्टा गरीबाची? पडला तर बरंय पण ज्येवढा मोजका तेवढा भला हो... न्हायतर समद नुस्कानच! पिक गेलं तर खायचं काय? आणि आताशा इतका नाटकी झालाय...पडतो काय गायब काय होतो....मी तर दर येळी त्या इठ्ठलाला सांगतो वारीला जसा सोबत आनतोस तसा मोजकाच पाड की; उगीच पाणी पाणी करून केलेली मेहनत पाण्यात नको जायला..पोर जातात ओ भिजायला,खेळायला मी बी जायचो लहान होतो तेव्हा...अगदी शाळेत गेलतो तेव्हापर...पार एकदम.. आता पोट तर पाह्यला पाहिजेच का नाय? जातात ते कष्ट नि रहातो तो पाऊस उनाडक्या करनारा..बाकी काय?
(क्रमश:)


ता .क .पाऊस नेहमीच नवे नवे संदर्भ घेऊन येतो. ही काही पाऊस-मनं। वेगवेगळे दृष्टीकोन...ज्याचे त्याचे... आणि 'क्रमश:' यासाठी कारण आणखी पाऊस-मनं भेटतच राहणार..

8 comments:

  1. वाह! मस्तच
    पण सांगू का पाऊस न आवडणार्‍या माणसांचं मला नेहमी विशेष वाटत
    पण त्याहुनही विशेष वाटत ते भिजायला आवदत नाही म्हणणार्‍यांचं..
    पाऊस म्हणजे भिजायला हवचं. खिडकीतुन पाहून काय कळणार पाऊस...
    तरिही तू म्हणालीस तसं...
    ज्याचा त्याचा पाऊस वेगळा...

    ReplyDelete
    Replies
    1. आभार्स प्रिया फडणीस! पण असेही असतातच..

      Delete
    2. क्रमश: पुर्ण कधी करणारेस???
      मी वाट पहातेय :)

      Delete
  2. Nice.... Majha paus mhanje tapariwarcha garma garam chaha aani mast Kolhapuri wada paav....

    ReplyDelete
    Replies
    1. म्हणूनच क्रमश: :)

      Delete
    2. Hmmmm Aani Mitransobat Mast Tour Pan...... :)

      Delete
  3. मस्तंय गं...
    पावसाचा माझा संदर्भ इतका बदललाय की हे सगळं कोणे एके काळी माझिया मनाला पण वाटायचं असा विचार करतेय..

    अगं म्हणजे काही नाही अति पावसाळी जागी राहायला आलेय मी मागची दोनेक वर्षे तेव्हापासून कधी नव्हे तो नसण्याची वाट पाहायला लागलेय मी...

    आणि अनिश म्हणजे आता म्हणायचं का आम्ही, " तो रविकर का गोजिरवाणा.. ;) " ही ही ही.....मस्त पोस्ट.....

    ReplyDelete
  4. आभार्स अपर्णा!
    तो रविकर का गोजिरवाणा. :-D :-P :)

    ReplyDelete