Thursday, August 13, 2015

कुत्रा ,भीती आणि मी!-भाग १

  लहानपणी कोणत्या गोष्टीची भीती वाटते? असा प्रश्न विचारला कि माझं उत्तर 'कुत्र्याची' हे ठरलेल असायचं. हळूहळू कुत्रा हा पाळीव प्राणी म्हणून परिचयाचा झाला. लोक कुत्रा घरात प्रेमाने पाळतात हेही कळल. 

सोसायटीमध्ये एका दादा कडे डॉबरमँन होता. त्याच भुंकण ऐकूनच धडकी भरायची. तो कधी चावल्याच ऐकिवात नव्हत पण अगदी मित्रासारखा वगैरे मलातरी वाटला नाही. खेळताना राजू दादाने त्याला मैदानातून हाक मारली "रॉकी…" कि सगळ बालमंडळ लपाछुपीच नाटक करायचं. मैदान क्षणात एकदम मोकळ! आणि चौथ्या मजल्यावरून धडधडत आणि सगळ्यांना धडधडवत रॉकी दिमाखात खाली यायचा. तो सोसायटीच्या गेट मधून दृष्टीआड होईपर्यंत बाहेर पडायची कोणाचीच बिशाद नसे.

             रस्त्यावरून जाताना कुत्र्याचा आवाज आला कि माझी पाचावर धारण बसणार हा अलिखित नियम.…. 

अस हे कुत्रे-भय पुराण माझ्यासोबत सुरूच राहील. कॉलेज मध्ये आमच्या आवडत्या प्राध्यापिका नेहमी कुत्र्यावर फार माया करीत. त्यांच्या निमित्ताने कुत्रा शेजारी असण संयमाने कस सोसाव याचे धडे मिळत होते. पण या संयमाचा उद्रेक त्यांच्याच घरी होईल अस मला कधीच वाटल नव्हत.तर झाल अस की,एकदा आम्ही ५ जण आमच्या त्यांच्या घरी गेलो होतो. मी त्यांच्या घरी कुत्रा आहे ऐकून होते. आणि तो मायाळू आहे हेसुद्धा ऐकून होते. त्यामुळे मनाची तयारी केली होती.'' घाबरायचं नाही . मायाळू कुत्रा आहे.''
आम्ही त्यांच्या दारात उभे होतो; दारावर लिहिलं होत," भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे" हुश्श! पुन्हा "एकदा घाबरायचं नाही. मायाळू कुत्रा आहे." असा जप करत मी दारावरची बेल वाजवली आणि आतून मायाळू हाका सुरु झाल्या. पुन्हा माझ घाबरण सुरु झालं. आमच्या मॅडम  प्रसन्न हसत दारात उभ्या होत्या आणि आमच लक्ष खिळल होत त्यांच्या पायाशेजारच्या फिक्कट पांढर्या रंगाचा मोठाला कुत्र्याकडे! त्याने आम्ही घरात यायच्या आधीच भुंकायला (सॉरी) हाक मारायला सुरुवात केली. मी दारातच घुटमळले. मॅडमच्या ते लक्षात आलं. " अगं तुम्ही आवडलात त्यांना बाकी काही नाही" असं बोलत हसत हसत त्यांनी मागे वळत म्हटलं,"गुंडूळ, आत जा, आणि कल्लू, तुपण रे!"
आई ग्ग हा कहर होता इकडे एका घरात दोन दोन कुत्रे सॉरी डॉगी होते (कारण कुत्रे पाळणार्यांना आवडत नाही कुत्रे म्हटलेलं) आणि मी पण! माझ्या तोंडच पाणी पळाल. उत्साह तसाही थंडावलाच होता. आम्ही थोडावेळ बोललो आणि तेवढ्यात मॅडम म्हणाल्या," अरे हो, तू लायब्ररीत जा ना, तुला काय हवाय ते बघ' मी दबकत दबकत सांगितलेल्या दिशेने गेले. समोर पुस्तकं दिसल्यावर जर बर वाटलं. पुन्हा उत्साहात मी एक एक पुस्तक चाळू लागले आणि केव्हा खाली बसले लक्षातही आल नाही. एवढ्यात माझ्या समोर गुंडूळ येउन उभा राहिला.माझ्याही नकळत त्याचे पुढचे पाय त्याने माझ्या खांद्यांवर ठेवले… त्याची ३० सेमी लांब जीभ बाहेर काढली आणि माझ्या मागे दुसरा डॉगी माझ्या उजव्या कानापाशी येउन गुर्र गुर्र करू लागला. हृदय आता बंद पडणार कि नंतर या अवस्थेत मी हतबल होऊन रडवेल्या आवाजात "मॅडम, वाचवा प्लीज" अशी आळवणी केली. मॅडम चे श्री सुद्धा माझ्या आवाजाने घाबरून पुस्तकांच्या खोलीत आले आणि मला विचारलं "भीती वाटते का तुला?" मी कसबसं  रडवेल्या आवाजात "हो" म्हटलं. त्यांनी पुन्हा दमदार आवाजात  आज्ञा दिली," बाजूला व्हा दोघेही!" अस म्हणताच दोघेही निघून गेले आणि माझा जीव भांड्यात पडला. मी किलकिले डोळे करत पाहिलं आणि खरंच दोघेही नाहीयेत याची खात्री झाली तेव्हा कुठे मला हायसं वाटलं. " अगं,त्याला जेव्हा माणसं आवडतात  ना त्यांनाच तो अस करतो; काय तूपण?" अस म्हणून हसत हसत मॅडम निघून गेल्या. बाहेर जाऊन त्यांनी पुन्हा एकदा" त्या खोलीत जायचं नाही;अजिबात." अस दोघांनाही दरडावल.  
मला उगीचच थोडं अपराधी वाटलं. (आणि माझ्या कुत्रांच्या भय -पुराणात आणखी एका आख्यायिकेची भर पडली. आणि माझी भीती वाढली हो गोष्ट वेगळी.)  लायब्ररीबाहेर येतानासुद्धा मी दोघांचा कानोसा घेत हळूहळू बाहेर आले. दोघेही माझ्याकडे पाहतायत असा मला भास होत होता. नंतर आम्ही बोलत असताना आमच्या समोर मुकाट्याने बसलेले हे दोघे मघाचेच का याच कोड मला उलगडत नव्हत. माझे मित्रमैत्रिणीसुद्धा मुद्दाम त्यांना "सो स्वीट डॉगी" अस म्हणत माझ्याकडे पाहून हळूच हसत होते. माझी एक मैत्रीण तर गुंडूळ ला गोंजारत बसली होती." ते पाहून मला आणखी वाईट वाटलं जरा जास्तच घाबरलो असही वाटलं. 

            आम्ही निघालो तेव्हा गुंडूळ आमच्याकडे पाहत शांतपणे उभा होता. मी त्याच्याकडे पाहिलं तेव्हा आणि स्तब्ध झाले. इतके निरागस आणि बिचारे डोळे!! वाटल, "आपणच घाबरवल कि काय ह्याला?" तेवढ्यात मॅडम 'काय गं? काय झाल?" अस म्हणाल्या तेव्हा मी भानावर आले. मला दोघांचीही फारच दया आली. थोड घाबरतच मी जाऊन गुंडूळच्या डोक्यावरून हात फिरवला. त्याने उभा राहून शेपूट हलवत त्याचा आनंद व्यक्त केला. 

(क्रमश:) 

Sunday, March 8, 2015

भेट


स्वच्छंदीचं हे रूप मला खूप आवडलं; मस्त आहे  नं? 
ही हृद्य भेट दिली आहे रुपेश चंदनशिव यांनी!
लिहिण्यास प्रोत्साहन मिळाव म्हणून :)
रुपेश,तुमचे खूप आभार! 

Saturday, January 17, 2015

अजनबी मुलाकात

मेहसूस करते थे हम 
उस सेहमे से एहसास को..
बिखर सा गया था
अनकहासा कही वोह|

ना जाने कहाँसे
छा गयी अजनबीसी?
ना पहचान हैं..
जान उलझीं हुई सी..

ना दर्द मिलें
न ग़म का हों साया;
उनकी मुस्कुराहटोमे
था दिल ये समाया|

निगाहें न मिली
लफ़्ज़ हो गए लापता,
ख़्वाहिशें न रहीं
और बस्स.....
कर  दिए अलविदा |

-पल्लवी
 ४/१/२०१५

Monday, October 27, 2014

दिवाली डाएट!



दिवाळीच्या  खरेदीसाठी मी मैत्रिणीसोबत फेरफटका मारत होते. दिवाळीच्या चाहुलीने फुललेली बाजारपेठ आणि सगळ्यांच्या उत्साहाला आलेलं उधाण अशा दिवालीमय वातावरणात आमची तुफान खरेदी सुरु होती. दिवाळी म्हटलं कि खाद्यपदार्थ आले आणि अलीकडे जास्तीचा फराळ बरेचदा  खाद्यपदार्थांच्या विक्रेत्यांकडून खरेदी केला जातो. आम्हीदेखील याला अपवाद नाही. मुंबईतील बाजारपेठांमध्ये अनेकविध दिव्यांसोबत पदार्थांचा घमघमाट सुटला होता.आम्ही आमच्या नेहमीच्या खवैय्या स्पेशल काकांच्या दुकानात गेलो रंगीबेरंगी मिठाई ,विविध सुक्यामेव्याने लगडलेले गोड पदार्थ विविधरंगी करंज्या, विविध धान्यांनी बनलेल्या चकल्या [या बाराही महिने उपलब्ध असतात म्हणा;पण दिवाळी विशेष :)]… खवय्यांसाठी दावतच जणू! 

माझी मैत्रीण मला म्हणाली, "दिवाळीसाठी जेवढा 'वेट लॉस' केलाय न तेव्हढ पुन्हा 'गेन'  होणार बघ माझं!" तेवढ्या शेजारच्या काकूंनी दुकानदाराला सांगितलं "शुगर-फ्री- लाडू द्या - बेसनाचे" ते ऐकून माझी मैत्रीणसुद्धा " वाह,सुगर -फ्री लाडू? घेऊ का मीपण?' तेवढाच गिल्ट-फ्री खाता येईल आणि वेट गेन ची भीती पण नाही व्हॉट से?" मी हसून सहमती दर्शविली आणि हिने दिमाखात अर्धा किलो 'शुगर- फ्री' लाडूच फर्मान सोडलं! "हो पण शुगर फ्री आहे म्हणून जास्तीचे लाडू खाल्लेस तर मात्र weight  विल नॉट wait" "हो, तेपण आहेच" 'आय  प्रॉमिस, इट्स माय दिवाली डाएट! '"मग अगदीच चालेल"त्यावर दोघीही हसलो.  तिच्या या 'दिवाळी डाएट' संकल्पनेने माझ्यातल्या आहार-तज्ञाला विचार करायला भाग पडल नसेल तर नवल कसले?  

आहार, डाएट हा खर तर प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आणि तितक्याच कुतूहलाचा विषय! दिवाळीच्या सेलिब्रेशन मूडमध्ये हे डाएट जणू गायब होऊन जात आणि नंतर हिरमुसलेल्या चेहऱ्याने वजन-काट्याशी असणारं  वैमनस्य डोकावू लागतं . दिवाळीचा फराळ ,विविध मिठाईचे  प्रकार हे रोजच जेवण होऊ लागत . चंद्र कलेकलेने वाढतो तास वजन किलोकिलोने वाढू लागत. काय कराव बर नेमक? दिवाळीच्या दिवसात काय डाएट करावा ।कय आहार घ्यावा याबद्दल थोडेसे:


१. दिवाळीच्या फराळातील गोड पदार्थ सकाळी खावेत. उदा. लाडू , शंकरपाळे, अनारसे ।हो;शुगर-फ्री असले तरी!
२. जेवणानंतर लगेच गोड खाणे खाऊ नका त्यामुळे अतिरिक्त चरबी-संचय होण्याची शक्यता वाढते . आणि वजन देखील!
३. मुळात हे लक्षात घ्यायला हवे कि फराळ हे मुख्य जेवण नव्हे; ते दोन जेवनमधील खाण्याचा पर्याय होऊ शकतात. उदा. चकली, चिवडा 
४. भरपेट फराळ खाण्यापेक्षा नेमके खा. अवाजवी खाणे टाळा. 
५. पानी का काम सिर्फ पानीही करता हैं! भरपूर पाणी प्या; तहान लागण्याची वाट  पाहू नका.  
६. दिवाळीच्या निमित्ताने पोटावर  अतिक्रमण दूर करण्यासाठी नियमित व्यायाम करा. 
या दिवाळीत स्वस्थ रहा सुस्त नको! हि दिवाळी तुम्हाला आरोग्य आणि मन:शांती देवो हि सदिच्छा !

ता. क .: आता हे लिहिताना शुद्ध तुपातील सुक्यामेव्याचे मुगाचे लाडू खाते आहे. घरच्या फराळाचा आनंद'शुगर फ्री'ला कळत नाही. असो. :)

उशीरा पोस्ट  केल्याबद्दल क्षमस्व!

हा लेख 'कलाविष्कार'ई दिवाळी अंकात प्रकाशित करण्यात आला आहे. 

आपण कलाविष्कार, ई दिवाळी अंक, ऑक्टोबर - २०१४ ची मोफत प्रत खालील लिंकवर क्लिक करून मोफत डाऊनलोड करू शकता किंवा मोफत ओनलाईन वाचू ही शकता

Sunday, September 7, 2014

राष्ट्रीय पोषण आठवडा विशेष-२०१४

सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा  भारतात 'राष्ट्रीय पोषण आठवडा' म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने गुगल-ए -आझम च्या या काळात आहार आणि पोषण तज्ञ या नात्याने काही 'पोषक-मूल्ये' मी माझ्या चेहरे-पुस्तक भिंतीवर लिहिली आहेत . समस्त ब्लॉगर मंडळींना माझ्याकडून छोटीशी भेट!

१. तुमचा दिवस 'फल'दायी जावो!

२. रोज १ वाटी पालेभाज्यांचे सेवन तुम्हाला खारट पदार्थांचे अतिसेवन करण्याच्या तीव्र इच्छेपासून थांबवू शकते. 

३. पाण्याला चव नसते परंतु पाणी पिणे निरोगी आयुष्यासाठी अत्यावश्यक आहे; म्हणजे सगळेच पोषक पदार्थ बेचव असतात कि काय ? पण म्हटलंय ना," पाणी का काम तो पानीही करता हैं।" ;-)

४.  जटील (तंतूयुक्त) कर्बोदके (complex carbohydrates) = सोपी पचनक्रिया!

५. दिवसभरात किमान एक चॉकलेट ही  तुमची गरज  असेल तर तुमच्या शरीराला सुक्या-मेव्याची गरज आहे हे लक्षात ठेवा. 

६. बंद पाकिटातील  मसालेदार चमचमीत खाद्यपदार्थांवर ताव मारून तुमचा वेळ छान जाईल; आणि  नेहमीच्या जेवणात चिमूटभर घरगुती मसाल्यांचा वापर तुमचे आयुष्य छान आणि निरोगी करतील :)

७. रोज वापरल्या जाणाऱ्या साबण किंवा क्रीम्स किंवा चॉकलेट पेक्षा रोज २ ते ३ कप दूध किंवा ताजे दही किंवा ताक यांचे सेवन नक्कीच  गुणकारी आहे. 

-पल्लवी सावंत,