Wednesday, August 1, 2012

ज्याचा त्याचा पाऊस -२


१३.
पाऊस म्हटलं कि मला आठवत आम्ही सगळी भावंड लहानपणी एकत्र येऊन वाड्यामागच्या तळ्यावर जायचो घरातील कागद घेऊन.. होड्या बनवायचो.. आणि मस्त खेळायचो पावसात...
एकदा तर दादांची (आमच्या आजोबांची) छत्री घेऊन तीत पाणी भरून होड्या गोल गोल फिरवत बसलो होतो  काय ओरडा खाल्लाय..अर्थात आऊ साहेबांचा! आणि गम्मत म्हणजे दुसऱ्या दिवशी दादा स्वतःच आले आणि आम्हाला त्यांची छत्री देऊन म्हणाल," भरपूर धमाल करा पठ्ठ्यानो.. हेच दिवस उलट्या छत्रीत पाऊस साठवायचे...कित्ती खूष झाले होते मी आता मोठ झाल्यावर दादाचं बोलण उमगतंय मला...तेच दिवस उलट्या छत्रीत पाऊस साठवायचे..

१४.
अलीकडे फक्त गाडीतून पाऊस भेटतो तितकाच..बरेच दिवसात मनसोक्त भिजलो नाहीये पावसात..आयुष्य काय सिनेमातल्यासारख असतं होय? त्या जब वी मेट मध्ये शाहीद आणि करीना काय सुंदर नाचतात ग पावसात? मी गाडी थांबली कि त्या पावसात त्या दोघांना पाहतो आणि गाडीतून बाहेर पडून त्यांच्यासोबत नाचत राहतो...बराच वेळ....पाऊस..असा अलिप्त आणि पांढरपेशा झालाय आताशा..माझ्यासाठी 

१५.
बारिश आयी तो मालक बहोत डाटता है| "रास्ता ख़राब हो तो कैसेभी करके बनाओ बनाओ" कहता रहता है.. "रात दिन मर मर के काम शुरू करो और ऐसे करो की फिर से रास्ता बनाना पड़े अगली बारिश में| बहोत बार दिल किया इसका असली चेहरा दुनिया के सामने लाऊ..बतादू सबको माल में बहोत गफला करता है..और बारिश को गलद ठहराता है.. मै तो बारिश का दीवाना हूँ और ये उसीको गलाद कहता है...बदमाश.. लेकिन मै तो ज्यादा पढ़ा लिखा हूँ नहीं|
लेकिन एक बात अच्छी है बारिश दूध का दूध और पानी का पानी कर देती है !

१६.
पाऊस म्हणजे..अस कस सांगणार..पाऊस म्हणजे ओह्ह नो..हा बघ पाऊस असा कोसळायला हवा पाऊस..पाऊस आहाहाहा याला म्हणतात पाऊस... मी बघतच राहिले..
अलीकडे मी नुसत पाऊस म्हटलं तरी पाऊस पडतो..अगं खरच ( असं लूक देऊ नको..) मलाच आश्चर्य वाटायला लागलंय! त्याला कळलं असाव बहुधा.. आपल अस बरसन कोणालातरी इतक सुखावून जात.. वेडा पाऊस!

१७.
पाऊस म्हटलं कि मला आठवतो श्रावण गं! आम्ही सगळ्याजणी मिळवून इतके खेळ खेळायचो..सोबत पाऊस असेच. खास कोणाचं तरी घरच बुक करून टाकायचो... आताच्या नव्या मुलीपण हौशी आहेत गं...कालच कमल मला म्हणाली सुनेची मंगळागौर आहे म्हणून...सगळ पुन्हा आठवलं काय दिवस होते मी तर इतक्या हिरीरीने गाणी म्हणायचे,आणि खेळायचे...(इथे आजीच खट्याळ हसण)
मला आठवत एकदा अश्याच फुगड्या रंगल्या होतं आणि तुझे मामा आजोबा त्यांनी कुठूनसा प्लास्टिकचा साप सोडला आमच्यात... रेखाची..तुझी मावशीआज्जी गं.. अशी बोबडी वळली की विचारू नको...बर बाहेर तर पाऊस..जाणार कुठे वेडी? सगळ्यांची हसून हसून पुरेवाट..झाली होती..त्याला नेहमीच खोड होती अस काहीतरी करत रहायची आणि रेखा नवी त्यावर्षी (आज्जी अशीच काय काय सांगत राहिली आणि मी बाहेरचा झिम्माड पाऊस पाहण्यात तिच्या आठवणीत बुडून गेले)

१७.
मला पाऊस म्हटलं कि अभिराजने तयार केलेली होडी आठवते.एकदा मस्त रात्रभर पाऊस कोसळला होतं आणि हा पठ्ठ्या मला जोर जोरात हाक मारत होता ताई तायडे ताई,लौक्कर बाहेर ये!
हा बघ पाऊस.. आणि हे बघ मी काय बनवलाय...मी जाऊन पाहिलं तर हे महाशय मस्त साचलेल्या पाण्यात होडी सोडत टाळ्या वाजवत होते..मला गम्मतच वाटली त्याची! आणि थोड्या वेळाने लक्षात आलं या माणसाने माझीच कोरी वही वापरली होती होडीसाठी!! मग सगळा गोंधळ आणि भांडण..रडारड. सगळ साग्रसंगीत साजर झालं. अभिला कळेच ना त्याच काय चुकलंय.. मग आऊसाहेबांनी समजूत काढली. आणि माझा छोटा भावडा बिचारा..एवढास तोंड झालं त्याचं! मी रडून धुमाकूळ घातला होता. मी आधी घुश्श्यातच होते.एकटीच बसले होते;त्याच्याशी काहीच न बोलता! तर मला म्हणतो,"तायडे, ही घे तुजी वही! मला नको ती.. पुन्हा होडी करणार नाही. सॉरी मी डोळ्याच्या कोपऱ्यातूनच  पाहिलं.. तर त्याने सगळ्या होड्या सोडवून कागद पुन्हा सरळ केलेले मला इतकं हसू आलं त्याचा वेडेपणा पाहून! त्याला तसाच घेऊन मी बाहेर गेले..मस्त पाऊस पडत होता..म्हटलं "चल, होड्या बनवूया!".दोघांची दोन मिनिटात बट्टी झाली. असा वेडा पाऊस आणि माझा वेडा भावडा आणि मी!

१८.
माझा पाऊस म्हणजे कर्नाळ्यापर्यंतचा रम्य प्रवास! बस मध्ये मस्त गाण्यांच्या भेंड्या सुरु होत्या. आणि मी बाहेर कोसळणाऱ्या पावसात गुंतून राहिले होते.. धुवांधार पावसात रमण म्हणजे काय ते अनुभवत होते. रस्त्यावर दाटलेलं धुकं तेही पावसात! आणि हाय :) ते इंद्रधनुष्य! मी माझी नव्हतेच जणू.. त्या पावसाचीच होऊन गेले होते. तेव्हापासून मला पाऊस जास्तच आवडतो. रम्य पाऊस! 

१९.
पाऊस म्हटलं की मला आठवत माझ गाव! गावच्या घरामागची संथ वाहणारी नदी आणि त्या नदीकिनारी बहरलेलं माझ बालपण! पावसात नदी नेहमीच वेगळी दिसत असे. मला वाटायचं पाऊस या नदीपासून सुरु होतो आणि हिच्यावरच संपतो...नंतर विज्ञान शिकताना समजलं समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन नंतर पाऊस पडतो...तेव्हा वाटल आपली नदी सुद्धा साद देत असेलच आभाळाला! उगीच नाही आपल्याला भावत नदीकाठचा पाऊस! असं वाटत या नदीमध्ये आपणही विलीन होऊन जावं. मुंबईत सगळे एकतर मरीनलाईन्स च्या किनाऱ्यावर पाऊस एन्जॉय करतात किंवा घरात बसून खिडकीतून पाऊस अनुभवतात. पण ते निसर्गाशी एकरूप होण मी,माझा पाऊस आणि माझी नदीच जाणो!

२०.
ओह माय गॉंड पाऊस. तुला माहितेय मी बॉय'ज हॉस्टेल मध्ये राहायचो तेव्हा माझा एक मित्र होता वेदांत..इतकी छान गिटार वाजवायचा तो! कॉलेजचा रॉकस्टार होता तो...पाऊस असला कि तो इतका तल्लीन होऊन वाजवत असे कि असं वाटायचं याच हे संगीत कधी संपूच नये. त्याच्या भोवताली सदानकदा मुलींचा गराडा असे. पण याने कधी शायनिंग मारलेली नाही. एकदम वल्ली माणूस! फक्त खोलीत आला कि मिश्कील चेहरा! आमचा रूम मते अमेय मस्त गाणी लिहायचा आणि गायचासुद्धा!
पाऊस सुरु झाला की हे दोघे सुरु!हा मस्त गिटार घेऊन बसायचा..थोड्या वेळाने अमेयची गाणी..पाऊस संपेपर्यंत तेच! अगदी रात्री २-३ वाजले! त्याची गिटारची धून, अमेयचा आवाज,गाणी  आणि तो पाऊस बास्स! 
            आता सगळे बिझी असतात.फारसं भेटणही होत नाही. कधीतरी फोन, इंटरनेट इतकंच! अमेय पुण्याला  असतो आणि वेदांत गोव्याला! पण पाऊस असला की मी फार मिस करतो त्यांना!
त्याच ड्रंग डिंग.. म्युझिकल रेन यु नो...


ता. क. पाऊस असाच भिजवत राहणार! तुम्हाला, मला नवे नवे अनुभव देत राहणार जुन्या आठवणींना स्वतःसोबत घेउन येणार ..तुमच्या पावसात मनसोक्त भिजत रहा..नव्याने (क्रमश :).





Friday, July 13, 2012

ज्याचा त्याचा पाऊस-१



१: 
पाऊस मला आवडतो;मज्जा नुसती! चपक ठपक ठपक  करत चालायचं  रस्त्याने ...पाणी उडवत; एक - दुसऱ्यावर.. रेनकोट,दप्तर असं सगळ तयार होऊन जायचं आणि खेळायचं मज्जा मज्जा! यावेळी मी आईला म्हटलं होत छत्री हवीये पण भिजते न मी आणि आजारी पडते(असं आई म्हणते) यावर्षी छत्री नाही. मी हायस्कूलमध्ये गेल्यावर छत्रीच घेणारेय..आम्ही सहाजण नं..म्हणजे मी,अदिती,रंजन,सुरभी,पंचमी,शार्दुल आम्ही नं सगळे एकदम धम्माल करतो रस्त्याने येताना! मुद्दाम भिजतो आणि खूप खूप हसतो.. एकदम मोठ्या मोठ्याने असं वर बघायचं पाऊस आ करून खायचा आणि पुन्हा हसायचं शाळेतून येताना पाऊस असला कि मज्जा मज्जा सगळी
२.
मला नं पावसात भिजायला आवडत! असं वाटत पाऊस रुजत राहावा फक्त आपल्यात संपूच नये! प्रसन्न वाटत अगदी :)
३.
पाऊस म्हणजे मातीचा सुगंध...काहीजण उगाच वास वगैरे म्हणतात बावळटासारखे. एकजात मूर्ख! गंध गं गंध!! श्वासात भरून घ्यावा इतका निर्मळ...आणि सुखद! वास म्हणे.. वेडे एकजात सगळे
४. 
उगाच नाही कवी लोक कविता वगैरे लिहित पावसावर...एकीकडे पाऊस सुरु असतो आणि एकीकडे कवींच्या कविता. पाऊस म्हणजे न देणगी आहे ग...किती बोलाव संपता संपत नाही. लहान बाळ,शाळेत जाणार मूल, तरुण,वयस्क,आजी आजोबा...सगळ्यांना आवडतो पाउस! ऋतूराज म्हटलं तर वावग ठरू नये. माझ्यापुरत सांगायचं झाल तर पाउस म्हणजे कधीही जुना न होणारा अनुभव आहे प्रत्येकासाठी...वेगळा आणि खास! शब्द अपुरे.. 
५.
पाऊस..एकदम स्पेशल ऋतू माझा.. तुला माहितेय,माझी आणि अनिशची भेट पावसातच झाली होती मस्त कुंद वगैरे म्हणतात न तसं वातावरण होतं ...आणि मी एकटीच चालले होते...वाटेत याने लिफ्ट देऊ केली होती...जेव्हा याच्यासोबत बसले तेव्हाच क्लिक झाला ग अनिश! त्यालाही तेव्हाच जाणवलं असाव कदाचित...पावसाने मला माझं बेस्ट माणूस दिलंय..तुलाही भेटेल बघ असाच कोणीतरी..
६. 
मला काही पावसाळा इतका आवडत नाही....चिखल सगळा...कित्ती ते पाणी...मस्त कोरड्या रस्त्यावर चालावं तर मध्येच हा येणार...मग छत्री उघडा आधी शोधा...असेल तर ठीक नाहीतर बोंबला..हे भिजत यायचं...थोडफार भिजलं ठीक आहे पण ऑफिसला जाताना आला  कि राग येतो ग खूप...दुष्टच वाटतो...घरी असले तर  पडावं नं पण नाही...असं कध्धीच होणार नाही...काही लोकांना पावसाळ्याच जरा जास्तच कौतुक असतं.म्हणजे असावं पण मला काही स्पेशल वगैरे वाटत नाही. हं मुंबईत पाणी टंचाई होऊ नये इतका पड आणि जा बाबा; धांदल उडवून फसवत जाऊ नको..
७.
पाऊस म्हणजे वाफाळता चहाचा कप आणि सोबत गाणी....अहाहा काय सांगू!! पाऊस म्हटलं कि जे फिलिंग येत न ते मुसळधार पावसात गरम चहाचा कप हाती ठेवून,मस्त खिडकीत बसून पाऊस नजरेत साठवून घेणाऱ्यालाच  ठाऊक! असं सांगून नाही कळायचं...
८.
पाऊस म्हटलं कि मला आपल कॉलेज आठवत गं...एकतर मस्त दाट हिरवळ असते सगळीकडे आणि आपला दंगा...चप्पल हातात घेऊन त्या वाहणाऱ्या पाण्यात चालायचं धमाल....नुसती... तुला माहितेय..ती कविता... सफेद घोड्यावर होऊन स्वार येईल कुठूनसा राजकुमार....पाऊस आपला राजकुमार म्हणजे माझा आणि तुझा...आभाळ बाबाला झाकोळून काळ्या-पांढऱ्या ढगांवर स्वार होत होत पाऊस बरसतो...आणि आणि कसं स्वच्छ  बरसण.. इथे कमी.. तिथे जास्त असं काही नाही पावसाच! असं कितीवेळा अनुभवलंय..हे घरात बसून पावसाचा आनंद लुटण वगैरे झूठ आहे ग सगळ...त्याच स्वागत करायचं नव्याने कारण दर वेळी तो नवीन असतो..मी तर मस्त घराबाहेर पडते...आता आईला पण सवय झालीये आता तिला माहितेय मी काही पावसात घरी थांबणार नाहीये ..मस्त मुक्त भटकायचं पावसात! प्रत्येक वेळी नव्याने भेटतो बघ पाऊस
९. 
पाऊस? किती बोलू आणि किती नको... तुला कल्पना नाहीये गेल्या वर्षी वर्षासहलीला गेलो होतो आम्ही धमाल..धमाल म्हणजे काय ते कळलं मला..अगं म्हणजे देणाऱ्याने देत जाव घेणाऱ्याने घेत जावे तसं मी फक्त आणि फक्त आनंद लुटत होते....त्यातून आमच्या ग्रुप मध्ये दोघे कवी होते काय सुंदर पाउस कविता ऐकवल्या त्यांनी दोन दिवस चिंब चिंब होऊन आलो आम्ही....मी शिरीषला पण सांगितलं होत बोअर होणार नाहीस आणि त्याने पण इतक एन्जोय केलाय...पाऊस!! मला तेव्हा वाटलं आपल्याकडे पाण्याचा पाऊस पडतोय ते बराच आहे ते बर्फ वगैरेचा पाऊस पडतो न त्यात असं न्हाऊन जाता येत नाही...पाऊस होऊन जातो आपण
१०.
पाऊस म्हणजे कवितांची मैफिल....म्हणजे माझी अशी कल्पना आहे कि पाऊस पडत असेल आणि जर कवीला कविता सुचत नसेल तर आयुष्य व्यर्थ ग...काहीच केल नाही असं म्हणेन मी..
पाऊस कसा का असेना रिमझिम,मुसळधार लेखणी लिहिती व्हायलाच हवी..आपण सगळे कसे कविता वाचत बसतो बर वाटत..भारलेल्या वातावरणात...पाऊस त्यात कविता....परमानंद।
११.
पावसात फूटबॉल खेळायचा तुफान,,,चिखलात! मस्त आम्ही सगळे फुल ओंन असतो खेळताना....डोक्याने टोलवायचा..आणि सुटायचं मैदानात झोकून द्यायचं सगळ्यांना शाळेचा ग्रूप आणि दुसरा एक पक्का फुटबॉलर्सचा ग्रुप आहे.अस्मानी तुफानी चा फील येतो..पाउस असेल तर.. मनसोक्त खेळायचं....पाऊस आपला पाठलाग करतो आपण त्याला निवांत त्याच काम करू द्यायचं आणि फुटबॉलवर मात्र आपलाच ताबा पाहिजे.. एकदम राजे आपण....आमच्यात गब्बू आहे न तो जाड्या गं..त्याला अस पळवतो म्हणून सांगू आम्ही.. ४ किलो वजन कमी झालंय त्याच खेळून खेळून.. गमतीचा भाग वेगळा पण खरच पावसामुळे जो उत्साह संचारतो नं तो वेगळाच असतो..फुटबॉल आणि पाऊस..हे अजब समीकरण आहे! 
१२.
पावसाबद्दल काय बोलनार ? उगा चेष्टा गरीबाची? पडला तर बरंय पण ज्येवढा मोजका तेवढा भला हो... न्हायतर समद नुस्कानच! पिक गेलं तर खायचं काय? आणि आताशा इतका नाटकी झालाय...पडतो काय गायब काय होतो....मी तर दर येळी त्या इठ्ठलाला सांगतो वारीला जसा सोबत आनतोस तसा मोजकाच पाड की; उगीच पाणी पाणी करून केलेली मेहनत पाण्यात नको जायला..पोर जातात ओ भिजायला,खेळायला मी बी जायचो लहान होतो तेव्हा...अगदी शाळेत गेलतो तेव्हापर...पार एकदम.. आता पोट तर पाह्यला पाहिजेच का नाय? जातात ते कष्ट नि रहातो तो पाऊस उनाडक्या करनारा..बाकी काय?
(क्रमश:)


ता .क .पाऊस नेहमीच नवे नवे संदर्भ घेऊन येतो. ही काही पाऊस-मनं। वेगवेगळे दृष्टीकोन...ज्याचे त्याचे... आणि 'क्रमश:' यासाठी कारण आणखी पाऊस-मनं भेटतच राहणार..

Tuesday, July 10, 2012


हवाओंसे हमने पूछा 
यह संदेस किसका है?
कम्बख्त सिर्फ बहारे बन गई
और बारिशे होने लगी
.
.
.
.
.
.हलके हलके गुफ्तगूसी!
-पल्लवी
८/७/२०१२ 

Saturday, July 7, 2012

पाऊस(त्याच्या मनातला)




त्या दूर आभाळामधुनी.. 
सांडले अनामिक मोती, 
तुझ्या पापण्यांवरची..
ती सरही नाजूक होती


लागे मज कसली आस?
या धूर्त किनाऱ्यावरती,
सुखवे स्पर्श लाटेचा..
उरली ती कोवळी रेती


मी मुक्त खयाली वेडा..
मन तुझे उमगले नाही,
आभास तुझे भवताली..
पाऊस उलगडे नाती!


मनमौजी मी अलवार
झेलतो सरी हातात..
वाटे जणू अल्लड वारा,
घुटमळतो या मेघांत.


वीज लखलखते ही न्यारी,
पडसाद अंतरी मोठे..
डोळ्यात तुझ्या तेव्हाही
हे क्षण मी वेचले होते...





 

ता.क...:फार सुंदर पाऊस पडतोय.. त्यानेच भाग पाडलंय हे लिहायला..)
५ जुलै २०१२ 

Saturday, June 30, 2012

पाऊस




पाऊस  म्हणजे जमिनीने आभाळाला दिलेला वरचा 'नी', 
पाऊस  म्हणजे...तिच्या डोळ्यात मुग्ध मी..
पाऊस म्हणजे पानासंगे गाते वेडे फुल,
पाऊस म्हणजे अनंताची अल्लड चाहूल,,
पाऊस  म्हणजे कवीच्या प्रतिभेचा अंकुर,
पाऊस  म्हणजे नव्याने गवसलेला सूर..
पाऊस  म्हणजे ढगांचे अस्तित्वामागचे  देणे,
पाऊस  म्हणजे निसर्गाचे नितांत सुंदर  लेणे..
पाऊस  म्हणजे हळुवार नात....पाउस म्हणजे सुसाट वाट..
पाऊस  म्हणजे रविराजाचे ओलावलेले प्रेमळ हात.
पाऊस  म्हणजे सर नितळ, अस्तित्वाला अर्थ फार, 
तो असतो आभाळभर; सोबत तिचा निरागस होकार... :)