Wednesday, September 23, 2015

बाप्पा

मैत्रिणीच्या घरी गणपती होता.  उकडीच्या मोदकांचा सुगंध दरवळला होता . दरवर्षीप्रमाणे यावर्षी जोरात आरती सुरु होती. येई ओ विठ्ठले  माउलिये सुरु झालं . निढळावरी करSS बराच ताणल.  मज्जा आली. घरी येऊन इतकं प्रसन्न वाटत होतं. भुर्रकन २० वर्षं मागे गेलं.
गणपतीच्या सुटीत   शाळेतून अभ्यास जायचा. ती वही  करताना  लक्ष खिडकीबाहेर असायचं.  दादा- ताई मैदानात  जमत.  मला अचानक भूक लागे. चल जेवूया.  म्हणत मी माझ मलाच वाढून घेई.
" अभ्यास झाला?"आई विचारे
"हम्म …. मी खाता खाता काहीतरी सांगायचा प्रयत्न करी"
"आरतीला जायची घाई  नको.  सगळे  सावकाश जेव गं। वेळ  आहे अजून"
गणपती बाप्पा SSS मोरया । मंगलमूर्ती मोरया SSS
"झालंपण "
"पाणी तरी पिऊन "……  पूर्ण होईपर्यंत माझी स्वारी उद्या मारत  असे
"पल्लू  आरती सुरु झाली सुद्धा  गं"  म्हणत एव्हाना जीत कधीच पळाला आरतीसाठी.
पहिली आरती आज देशपांडे काकांकडे सुरु झाली. मी त्यांच्या दारात पाहिलं …पूर्ण  गर्दी. त्यातून जागा काढत काढत मी पुढे जाई. मध्येच एखादी बसे. "अरे अरे आज टाळ दिसत नाही "" हे काय पिंकीच्या हातात "चला, आज टाळ्याच फक्त :("
समोर प्रसन्न बाप्पाची मूर्ती दिसे. देशपांडे काका छान धोतर-उपरणे नेसून आरती हातात घेऊन उभे असत . काकू आलीस का ये हो असा एक दृष्टीक्षेप टाकत मी  एका डोळ्याने त्यांच्या शेजारच्या प्रसादाच्या ताटाकडे लक्ष देऊन काय बारा असावं आज असा विचार करत उत्साहाने  जय जय घोषात एकरूप होऊन जाई.
शंकराची  आरती "दुर्गे दुर्गत भारी" "शेंदूर लाल चढायो" "गजानना श्री गणराया" येई ओ विठ्ठले" सगळ्याच आरत्या आवडत. येई ओ विठ्ठले माझी आवडती आरती त्यामागोमाग दशावताराची आरती - दहावा अवतार म्हणताना तो 'र' एवढा लाम्बायचा आणि तो संपेल या आशेवर आम्ही टाळ्या  किंवा ताल त्या तालात वाजवायचो. आमच्या कॉलनीत काहीजण भलतेच द्वाड होते (म्हणजे अजूनही आहेत :-p ) आरती सुरु असताना भलत्याच चाली सुरु करत. 'आरती ज्ञानराजा' ३ वेगवेगळ्या चालींवर . म्हणजे दर वेळी आम्हा लहान मुलांच्या टोळीचा गोंधळ उडे. आणि मग आम्ही मध्येच थांबलो कि आम्च्यातलंच स्मार्ट टाळक डोळे मिटून छुपी गद्दारी करत त्यात सामील होई. त्यात राजेश दादा  हातानेच बोल बोल असे म्हणत हसून दोन मिनिटात आम्हाला पुन्हा सामील करून घेई.  देशपांडे काका-पितळे काका- नंतर झा अंकल …. असा शिरस्ता  असे. ५ दिवस धम्माल नुसती. आरती, प्रसाद , टाळ , आरतीची पुस्तकं -लहान पुस्तक मोठी पुस्तकं …लोकसत्ताच पुस्तकं , मटाच पुस्तकं, आणि मोठ्या दादांकडे नेहमी असणारं आयताकृती मोठ पुस्तक …. मला नेहमी वाटायचं माणूस जितका उंच तितक पुस्तक मोठ. या नियमानुसार आमच्या टोळीतील समस्त चमूकडे आरतीच्या विविध आकाराची पुस्तक  असत. यादरम्यान आरती पाठ होऊ लागली. "ओं यज्ञेन यज्ञ" सुरु झालं कि सुरुवातीला वाटायचं कित्ती कठीण …. हे यायला हव  तेही कालांतराने पाठ झाल हणजे ५व्या दिवशीपर्यंत सगळ्या आरत्या पक्क्या होत आणि जाणीव होई कि चालले बाप्पा …… शेवटची आरती दणक्यात होई. साग्रसंगीत.

आरतीसाठी सगळ्यात बेस्ट घर म्हणजे पितळे काकाचं! त्यांचा प्रसाद भारी असे. उकडीचे मोदक किंवा पेढ्याचे मोदक कधी चॉकोलेट कधी बुंदीचा मोठ्ठा लाडू (वॉव ) कधी नारंगी रंग तर कधी हिरवा-पिवळा… कधी कधी लिमलेटच्या गोळ्या…आणि मला न चुकता मिळणारा extra प्रसाद!! त्यामुळे त्यांच्या गणपतीची आरती म्हणजे जणू व्रत वाटे.


गौरीच आगमन झाल की आई आणि काकूंचा ग्रुप सुद्धा सामील होई. अस वाटायचं काय भारीये हे गणपती आणि गौरीवले  सण . मोरे काकूंच्या घरी फुगड्यांचा बेत असे. दळवीकाकू , सावंत काकू ,राणे काकू , सुनिता ती सो ती ,योगिता सगळेच बेभान होत रात्र जगवायचे डीजे शिवाय! ती गाणी आणि वेगवेगळे आविष्कार पाहायला मला भारी वाटे. गम्मत म्हणून आम्हीसुद्धा फुगडी घालायचो. कोंबडा कधी जमेचना. काय धमक असायचा.

विसर्जनाच्या दिवशी सुदीप दादा आणि निलेश दादा गाडी सजवत. नारळीच्या फांद्या केळीच्या फांद्या ,फुलांचे हार बाप्पाची गाडी शानदार दिसे. मी कधी खिडकीतून तरी कधी गाडीसामोरच ती कलाकारी पाहण्यात किंवा करण्यात रमून जाई. फार गमतीशीर विचार यायचा मनात आपण पण बसव यात कसलं भारी वाटेल. मी एकदा विचारालाही होतं , "मीपण बसले  तर ; तर काय तुझाही विसर्जन होईल " अरेअरे मग तो विषयच सोडून दिला आता गम्मत वाटते.

लहानपण देगा देवा च्या आठवणीत किती भराभर बदलल सगळ...
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे म्हणत विसर्जनासाठी अर्ध्यावर जाऊन परतणारी मी आईसोबत बडबड करत बसते. गणपतीच्या सुटीतला गृहपाठ हातात ठेवून तिला कितीतरी गोष्टी सांगते. तीपण ऐकते. मोदकच्या सारणाचा सुगंध घरभर पसरलेला असतो.




Thursday, August 20, 2015

कुत्रे, भिती आणि मी- भाग-२

मॅडम च्या घरी घडलेल्या किस्स्यानंतर मी कुत्र्यांची जास्त धास्ती घेतली. अजून माझी भीती गेलेली नाही यावर शिक्कामोर्तब झाल होत.  रस्त्यावरील कुत्र्यांची मला जितकी भीती वाटत नसेल तितकी पाळीव कुत्र्यांची वाटते हेही कळून चुकलं होत. 

एकदा एका स्नेहींकडे गेले होते. बाहेर मोठी पाटी लिहिली होती. कुत्र्यांपासून सावध रहा. कृपया बेल वाजवा. मला आजूबाजूला कुत्र्याची चाहूल लागेना. पुढे जाव कि शेजारची बेल वाजवावी? कि सरळ फोनच करावा या संभ्रमात असताना माझ लक्ष समोर गेलं. आणि माझ उरलं सुरलं अवसानसुद्धा गळून गेलं :( एक काळ्या रंगाचं भयानक दिसणारं धूड माझ्याकडे निरखून पाहत होत आणि मी बेल दाबणार एवढ्यात त्याने मानेला एक जोराचा हिसडा देत माझ्या दिशेने कूच केलं… सोबत भुंकण सुरूच होत. दिलासा देणारी गोष्ट एकाच कि या पाळीव डॉगीला बांधून ठेवल्याने जमीन अस्मान एक करत त्याच भुंकण सुरु होत आणि माझी अवस्था एखाद्या वाळलेल्या गळून गेलेल्या पानासारखी भरकटली होती. एवढ्यात आमचे स्नेही बाहेर आले. "नॉरा, शांत बस पाहुणे आलेत आपल्याकडे" अस म्हणत त्यांनी मला अतिशय प्रेमाने "ये ग घाबरू नकोस काही करत नाही ती;आत ये" अस म्हटलं. 
मला मनात वाटलं,"यांना काय जातंय बोलायला? :( पाहुणे म्हणे आलेला माणूस स्वतःहून पळून जायचा हे अस भुंकण ऐकून!":( :( :( 
तरी मी शक्य तितक स्वतःला आवरून त्या नॉरासमोरून दबकत दबकत चालू लागले. 
"अग भीती वाटत असेल तर मागच्या दराने ये;आलोच मी!" अस म्हणत काकांनी मला दुसर्या दारातून यायला सांगितलं. मला गम्मत वाटली म्हणजे माणूस घाबरला तर मागून नाही घाबरला तर पुढल्या दराने हे सुद्धा लक्षात ठेवलाय घर बांधताना :) वाह! 

आत गेले तरी नॉराबाई भुंकत होत्या. त्याच  आमच बोलण सुरु झालं. आणि मला काका म्हणाले," थोड खाऊन  घेऊयात आपण" मी निमूट 'हो' म्हणाले . काकू लगबगीने," काय खाणार तू? हे देऊ? ते देऊ?" विचारू लागल्या. माझ लक्ष आता बंद झालेल्या आवाजाकडे होत आणि काकांनी नेमक ओळखलं आणि ते हसू लागले. माझी स्वतःत लागलेली तंद्री मोडून मी त्यांच्याकडे पाहू लागले. " किती घाबरावं माणसाने? काही करत नाही ती. हो दिसते खरी भयानक पण फार प्रेमळ आहे." मी नुसतं "हो का?" अस काहीसं म्हणाले. "अग हो, तुला माहितेय का? आमचा नातू तर बसतो तिच्यावर चक्क आणि तीपण मस्त एन्जॉय करते त्याला फिरवते सुद्धा!; कस आहे माहितेय का?" एव्हाना मी 'आ' वासून ऐकत होते… त्यातच मी भारावून त्यांच्या प्रश्नाला "नाही" अस उत्तर दिलं 
 " अरे १ वर्षाचा मुलगा घाबरत नाही? असं कसं? च्या आपण उगीचच घाबरलो असं पण वाटलं " 
काकांच्या गडगडाटी हसण्याने मी पुन्हा भानावर आले." अरे हो तुला कस ठाऊक असेल मी सांगितल्याशिवाय" यावर मी माझ्या वेडेपणावर हसू लागले. काकूही हसतच होत्या. पण एकंदरीत त्यांना माझ घाबरण आवडल नसावं. काका पुढे म्हणाले "तिला आम्ही बांधलीये गं. पण हा प्राणी इतका प्रामाणिक असतो न। तिचे एकेक किस्से ऐकशील तर तुलासुद्धा आवडायला लागेल आमची नॉरा! हिच तर फार जीव आहे तिच्यावर." मी फक्त मान हलवली. काकू सांगू लागल्या "मागे मला बर नव्हत आणि मी एकटीच होते घरात तर ही रात्रीची माझ्या बिछान्याभोव्तली फेऱ्या घालत राहायची. अगदी सकाळी ५.३०-६ वाजेपर्यंत " हे ऐकून मला नवल वाटलं. किती चूक करतो आपण ओळखण्यात अस वाटून गेलं. 

बोलता बोलता काकूंनी,"चल थोड खाऊन घेऊया" अस म्हटलं आणि त्यांच्या नाश्त्याच्या खोलीत आम्ही जाणार एवढ्यात नॉरा बाई हाक मारत आल्या. तिचं कौतुक ऐकून मला छान वाटल होत आणि फक्त त्यामुळेच मी तिच्या भुंकण्यातून मार्ग काढत नाश्ता करण्याच्या खोलीत (वरवर)धीराने प्रवेश केला. आणि पुन्हा नॉराबाई माझ्याकडे झेपावू लागल्या. " एक बिस्कीट भरव तिला तुझ्या हाताने ; त्यासाठीच चाललाय तिचा अट्टाहास" काकू अगदी लाडात सांगू लागल्या; " हो हो देतेय ह तुलासुद्धा!!" अस म्हणत तिच्या डोक्यावर हात फिरवू लागल्या आणि नॉरा काकूंचा  हात जिभेने चाटू लागली. त्याही प्रेमाने तिला गोंजारत होत्या. एवढ्यात माझ्या हातात काकांनी बिस्कीट दिलं आणि एखाद्या योद्ध्याला सांगाव तस "जा,हे भरव तिला" अस सांगितलं. त्याचं गमतीदार हसण मला त्यावेळी तरी अज्जिबात आवडला नाही. मी धीर करून तिला एका बिस्कीट देऊ केलं. देऊ केल काय फेकलंच. काकुनी माझ्याकडे विखारी पाहिलं आणि पुन्हा मावळ होत मला म्हणाल्या "अस नाही घेत ती अज्जिबात! राणी आहे आमची! मी दाखवते तुला कस भरवायच ते" अस म्हणत त्यांनी मला माझा हात हातात घेऊन तिच्या तोंडात बिस्कीट कस भरावयाच हे शिकवलं आणि त्याच दरम्यान नोराबाईची अडीच-तीन  इंची  जीभ माझा हात चाटू लागली. किळस वाटली मला आणि चेहरा शून्य ठेवून मी एखद्या रोबोसारखी उभी राहिले होते. काकू त्यापुढे काय म्हणाल्या हे मला अजूनही आठवत नाही. खाण माझ्या पोटात गेल नाही ही गोष्ट वेगळीच. घरी जाई पर्यंत मला तिची जीभ आणि सर्द झालेली मी याव्यतिरिक्त काहीही आठवत नव्हत. मी जाता जाता तिच्या कडे पाहिलं तेव्हा नॉरा अख्खा जबडा उघडून माझ्याकडे पाहत होती. माझ्या चेहर्यावरची नाराजी माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.

 मी काकूंशी  बोलत असताना पुन्हा नॉराबाई माझ्या दिशेने येऊ लागल्या. मी निघून जाऊ शकत नव्हते आणि प्रचंड घाबरले होते. एवढ्यात नॉराने माझ्या पायाचा तळवा चाटायला सुरुवात केली. माझ्या पायाला आधीच जखम झाली होती आणि नॉरा नेमकी तेच बोट चाटत होती. "तुला काही लागलय का पायाला?" मी हसत हो म्हटलं"क्रिकेट खेळताना जखम झाली होती" काकू आता मनापासून हसत म्हणाल्या" हम्म तेच कळलय आमच्या बाईंना. लवकर भरून यावी जखम म्हणून चाललाय हे सगळ!" नॉराबद्दलची  किळस जाऊन जिव्हाळा वाटू लागला माझ्याही नकळत मी हाताने तिला गोंजारलं भले भीत भीत गोंजारलं :)

समाप्त. 

ता. क.: राज ठाकरेंच्या पाळीव 'बॉन्ड' ने त्यांच्या सौ. वर केलेला हल्ला नेमका हि पोस्ट टाकताना ताजा आहे :(

Thursday, August 13, 2015

कुत्रा ,भीती आणि मी!-भाग १

  लहानपणी कोणत्या गोष्टीची भीती वाटते? असा प्रश्न विचारला कि माझं उत्तर 'कुत्र्याची' हे ठरलेल असायचं. हळूहळू कुत्रा हा पाळीव प्राणी म्हणून परिचयाचा झाला. लोक कुत्रा घरात प्रेमाने पाळतात हेही कळल. 

सोसायटीमध्ये एका दादा कडे डॉबरमँन होता. त्याच भुंकण ऐकूनच धडकी भरायची. तो कधी चावल्याच ऐकिवात नव्हत पण अगदी मित्रासारखा वगैरे मलातरी वाटला नाही. खेळताना राजू दादाने त्याला मैदानातून हाक मारली "रॉकी…" कि सगळ बालमंडळ लपाछुपीच नाटक करायचं. मैदान क्षणात एकदम मोकळ! आणि चौथ्या मजल्यावरून धडधडत आणि सगळ्यांना धडधडवत रॉकी दिमाखात खाली यायचा. तो सोसायटीच्या गेट मधून दृष्टीआड होईपर्यंत बाहेर पडायची कोणाचीच बिशाद नसे.

             रस्त्यावरून जाताना कुत्र्याचा आवाज आला कि माझी पाचावर धारण बसणार हा अलिखित नियम.…

अस हे कुत्रे-भय पुराण माझ्यासोबत सुरूच राहील. कॉलेज मध्ये आमच्या आवडत्या प्राध्यापिका नेहमी कुत्र्यावर फार माया करीत. त्यांच्या निमित्ताने कुत्रा शेजारी असण संयमाने कस सोसाव याचे धडे मिळत होते. पण या संयमाचा उद्रेक त्यांच्याच घरी होईल अस मला कधीच वाटल नव्हत.तर झाल अस की,एकदा आम्ही ५ जण आमच्या त्यांच्या घरी गेलो होतो. मी त्यांच्या घरी कुत्रा आहे ऐकून होते. आणि तो मायाळू आहे हेसुद्धा ऐकून होते. त्यामुळे मनाची तयारी केली होती.'' घाबरायचं नाही . मायाळू कुत्रा आहे.''
आम्ही त्यांच्या दारात उभे होतो; दारावर लिहिलं होत," भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे" हुश्श! पुन्हा "एकदा घाबरायचं नाही. मायाळू कुत्रा आहे." असा जप करत मी दारावरची बेल वाजवली आणि आतून मायाळू हाका सुरु झाल्या. पुन्हा माझ घाबरण सुरु झालं. आमच्या मॅडम  प्रसन्न हसत दारात उभ्या होत्या आणि आमच लक्ष खिळल होत त्यांच्या पायाशेजारच्या फिक्कट पांढर्या रंगाचा मोठाला कुत्र्याकडे! त्याने आम्ही घरात यायच्या आधीच भुंकायला (सॉरी) हाक मारायला सुरुवात केली. मी दारातच घुटमळले. मॅडमच्या ते लक्षात आलं. " अगं तुम्ही आवडलात त्यांना बाकी काही नाही" असं बोलत हसत हसत त्यांनी मागे वळत म्हटलं,"गुंडूळ, आत जा, आणि कल्लू, तुपण रे!"
आई ग्ग हा कहर होता इकडे एका घरात दोन दोन कुत्रे सॉरी डॉगी होते (कारण कुत्रे पाळणार्यांना आवडत नाही कुत्रे म्हटलेलं) आणि मी पण! माझ्या तोंडच पाणी पळाल. उत्साह तसाही थंडावलाच होता. आम्ही थोडावेळ बोललो आणि तेवढ्यात मॅडम म्हणाल्या," अरे हो, तू लायब्ररीत जा ना, तुला काय हवाय ते बघ' मी दबकत दबकत सांगितलेल्या दिशेने गेले. समोर पुस्तकं दिसल्यावर जर बर वाटलं. पुन्हा उत्साहात मी एक एक पुस्तक चाळू लागले आणि केव्हा खाली बसले लक्षातही आल नाही. एवढ्यात माझ्या समोर गुंडूळ येउन उभा राहिला.माझ्याही नकळत त्याचे पुढचे पाय त्याने माझ्या खांद्यांवर ठेवले… त्याची ३० सेमी लांब जीभ बाहेर काढली आणि माझ्या मागे दुसरा डॉगी माझ्या उजव्या कानापाशी येउन गुर्र गुर्र करू लागला. हृदय आता बंद पडणार कि नंतर या अवस्थेत मी हतबल होऊन रडवेल्या आवाजात "मॅडम, वाचवा प्लीज" अशी आळवणी केली. मॅडम चे श्री सुद्धा माझ्या आवाजाने घाबरून पुस्तकांच्या खोलीत आले आणि मला विचारलं "भीती वाटते का तुला?" मी कसबसं  रडवेल्या आवाजात "हो" म्हटलं. त्यांनी पुन्हा दमदार आवाजात  आज्ञा दिली," बाजूला व्हा दोघेही!" अस म्हणताच दोघेही निघून गेले आणि माझा जीव भांड्यात पडला. मी किलकिले डोळे करत पाहिलं आणि खरंच दोघेही नाहीयेत याची खात्री झाली तेव्हा कुठे मला हायसं वाटलं. " अगं,त्याला जेव्हा माणसं आवडतात  ना त्यांनाच तो अस करतो; काय तूपण?" अस म्हणून हसत हसत मॅडम निघून गेल्या. बाहेर जाऊन त्यांनी पुन्हा एकदा" त्या खोलीत जायचं नाही;अजिबात." अस दोघांनाही दरडावल.  
मला उगीचच थोडं अपराधी वाटलं. (आणि माझ्या कुत्रांच्या भय -पुराणात आणखी एका आख्यायिकेची भर पडली. आणि माझी भीती वाढली हो गोष्ट वेगळी.)  लायब्ररीबाहेर येतानासुद्धा मी दोघांचा कानोसा घेत हळूहळू बाहेर आले. दोघेही माझ्याकडे पाहतायत असा मला भास होत होता. नंतर आम्ही बोलत असताना आमच्या समोर मुकाट्याने बसलेले हे दोघे मघाचेच का याच कोड मला उलगडत नव्हत. माझे मित्रमैत्रिणीसुद्धा मुद्दाम त्यांना "सो स्वीट डॉगी" अस म्हणत माझ्याकडे पाहून हळूच हसत होते. माझी एक मैत्रीण तर गुंडूळ ला गोंजारत बसली होती." ते पाहून मला आणखी वाईट वाटलं जरा जास्तच घाबरलो असही वाटलं. 

            आम्ही निघालो तेव्हा गुंडूळ आमच्याकडे पाहत शांतपणे उभा होता. मी त्याच्याकडे पाहिलं तेव्हा आणि स्तब्ध झाले. इतके निरागस आणि बिचारे डोळे!! वाटल, "आपणच घाबरवल कि काय ह्याला?" तेवढ्यात मॅडम 'काय गं? काय झाल?" अस म्हणाल्या तेव्हा मी भानावर आले. मला दोघांचीही फारच दया आली. थोड घाबरतच मी जाऊन गुंडूळच्या डोक्यावरून हात फिरवला. त्याने उभा राहून शेपूट हलवत त्याचा आनंद व्यक्त केला. 

(क्रमश:) 

Sunday, March 8, 2015

भेट


स्वच्छंदीचं हे रूप मला खूप आवडलं; मस्त आहे  नं? 
ही हृद्य भेट दिली आहे रुपेश चंदनशिव यांनी!
लिहिण्यास प्रोत्साहन मिळाव म्हणून :)
रुपेश,तुमचे खूप आभार! 

Saturday, January 17, 2015

अजनबी मुलाकात

मेहसूस करते थे हम 
उस सेहमे से एहसास को..
बिखर सा गया था
अनकहासा कही वोह|

ना जाने कहाँसे
छा गयी अजनबीसी?
ना पहचान हैं..
जान उलझीं हुई सी..

ना दर्द मिलें
न ग़म का हों साया;
उनकी मुस्कुराहटोमे
था दिल ये समाया|

निगाहें न मिली
लफ़्ज़ हो गए लापता,
ख़्वाहिशें न रहीं
और बस्स.....
कर  दिए अलविदा |

-पल्लवी
 ४/१/२०१५