Saturday, June 30, 2012

पाऊस




पाऊस  म्हणजे जमिनीने आभाळाला दिलेला वरचा 'नी', 
पाऊस  म्हणजे...तिच्या डोळ्यात मुग्ध मी..
पाऊस म्हणजे पानासंगे गाते वेडे फुल,
पाऊस म्हणजे अनंताची अल्लड चाहूल,,
पाऊस  म्हणजे कवीच्या प्रतिभेचा अंकुर,
पाऊस  म्हणजे नव्याने गवसलेला सूर..
पाऊस  म्हणजे ढगांचे अस्तित्वामागचे  देणे,
पाऊस  म्हणजे निसर्गाचे नितांत सुंदर  लेणे..
पाऊस  म्हणजे हळुवार नात....पाउस म्हणजे सुसाट वाट..
पाऊस  म्हणजे रविराजाचे ओलावलेले प्रेमळ हात.
पाऊस  म्हणजे सर नितळ, अस्तित्वाला अर्थ फार, 
तो असतो आभाळभर; सोबत तिचा निरागस होकार... :)


Monday, June 11, 2012

पाऊस..बडबडगाणे!!



कुंद हवा दाटे आज
कानी येई अल्लड गाजI
तेच आकाश तेच ढग 
तरी वेगळे वाटे जगI

विज्ञानाचे आडाखे चुकवून
अचानक सांडे कोवळे ऊन,
ऊन-सावल्यांचा खेळ सारा 
मोसमी वारे अफलातूनI

आगमनाची सारी वर्दी
पाऊस झेलण्या आले दर्दी..
सफेद कापूस गडद रंग,
पाऊस- कौतुकात सारे दंगI
झिम्माड पाऊस ओली माती
पक्षी सारे गाणे गातीI 
ओल्या सरी हिरवे रान..
पाहून सारे हरपे भान..

निसर्ग सारा गोड निरागस
किती कौतुक गावे रे?
विरले  सारे पाश आता 
सरींच्या गावा जावे रे!
                                                                                     

Tuesday, June 5, 2012

बंद


आम्ही बंद केलाय बर का;आम्ही बंद केलाय 
आमचा आवाज आणि आमच्या संवेदनासुद्धा 
हो बंद केलाय आम्ही..
दरवाढीविरोधात जोरदार विरोध करण्यासाठी आम्ही बंद केलेत आमचेच रोजगार..
आणि मिळवून दिले आहे माजलेल्या नेत्यांना आयतेच स्वतःच्या शक्तीप्रदार्शनासाठीचे आगार!
घरी बसलोय आम्ही स्वतःचा आवाज बंद करून आणि TV मात्र मोठ्याने सुरु करून! 
पाहत होतो; कॅमेरा पहिला की गर्वाने ठरवून पोलीसगाडीत बसलेले 
आम्हीच निवडून दिलेले माजोरडे राजकारणी 
ज्यांच्या डोळ्यात होते फक्त फुशारकीचे  तर्रेबाज भाव आणि माज नेहमीसारखाच 
(याच मंत्र्याची मुलगी माझ्यासमोर सुरक्षित चारचाकीत बसून परीक्षेसाठीबरोबर अडीच वाजता कॉलेजमध्ये आली..... 
माझ्या डोक्यात वेगळीच तिडीक ...घणाचे घाव घण! घण! घण!!....
 मी आणि माझ्यासारखे बरेच मूर्ख! परीक्षेला उशीर होईल म्हणून सकाळी ८ वाजता घराबाहेर पडलेले  
सगळीकडे पायी फिरत... एक रेल्वेचा काय तो आधार फक्त 
आई बाबांचा काळजीने दाटलेला स्वर वाजणाऱ्या मोबाईलमधून)
 आणि हे काय?
व्वा!याच नेत्यांची माणस फिरताहेत बर का बाइक्सवरून..पक्षाचे झेंडे घेउन
ओरडत आहेत.. पेट्रोल दरवाढीविरोधात घोषणा देतायत.. बाईकवरून??
राग येतोय..की कीव करावी या मुर्खांची तेच समजेनास झालंय..
सगळा अस्वस्थ कारभार म्हणायचा... पैशाचा तमाशा दुसर काय?
तरी बरंय.. मी बंद केलीयेत माझी पंचेंद्रिय काही काळासाठी...
त्यांना त्रास होऊ नये या मूर्खपणाचा म्हणून..

अर्रे!! तरी पहिलाच मी एकाने समोरून बसवर मारलेला दगड आणि हसत ठोकलेली धूम??
तो काय.. कॅमेरा सुरु आहे समोर...लाइव्ह टेलिकास्ट सुरु आहे.. तरीच!
नेहमीचंच सगळ चित्र... 
हो मी बंद केलंय माझं मत त्या इलेक्ट्रिक मशीनमध्येच..
पण आता मी बंद केलाय सगळ्याचा विचार कारण
सगळ्यांना वाटत स्वतः काही न करत यांना काय टीका करायला?
पण माझा आवाजच बंद आहे सध्या
कारण मी 'बंद' केलाय माझ्या आयुष्यात; 
त्यामुळे या 'बंद'च काहीच वाटेनास झालंय 
कारण बंद केलंय हो आता विचार करणंच
अविचारी बंडाचा विचार डोकावतो अधूनमधून...
पण मी बंद केलंय माझं मत मांडण.. 
हे एवढंच अगदीच राहावलं नाही म्हणून; इतकंच! 

असो.